जागेची निवड आणि मांडणी
कोंबड्यांना आरामदायक आणि सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी जागेची निवड महत्त्वाची असते. लहान पोल्ट्री हाउससाठी प्रत्येक कोंबडीसाठी अधिक मोकळी जागा लागते, तर मोठ्या घरांमध्ये जागेचा एकत्रित उपयोग करता येतो. अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी 15 ते 25 पक्ष्यांच्या लहान गटांचे पालन फायदेशीर ठरते, जास्तीत जास्त 250 पक्ष्यांपर्यंत वाढ करता येते. व्यावसायिक युनिटसाठी 125 पक्ष्यांचे युनिट अधिक उपयुक्त मानले जाते. लांबट हाउस असल्यास प्रत्येक 20 फूटांवर घराचे विभाग करणे फायदेशीर ठरते.
हवामान नियंत्रण
कोंबड्यांना 10°C ते 21°C (50°F ते 70°F) पर्यंत तापमान अनुकूल असते. थंड हवामानात विशेषतः रात्री उबदार वातावरण देण्यासाठी इन्सुलेशनसाठी पेंढा, गवत, प्लास्टिक शीट्स यांचा वापर करता येतो. उन्हाळ्यात क्रॉस व्हेंटिलेशनद्वारे घर थंड ठेवता येते.
पुरेशी हवेशीर व्यवस्था
कोंबड्यांना भरपूर शुद्ध हवाची गरज असते. 2 किलो वजनाची एक कोंबडी दिवसाला सुमारे 52 लिटर कार्बन डायऑक्साइड निर्माण करते, त्यामुळे घर पुरेसे उंच आणि हवेशीर असणे आवश्यक आहे. वायुवीजन योग्य नसेल तर कोंबड्यांना त्रास होतो, त्यांचे आरोग्य बिघडते.
कोरडेपणा राखणे
घर कोरडे ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ओलसरपणा म्हणजे आजारांना निमंत्रण. ओलावा विविध मार्गांनी घरात येतो. जमिनीखालून, भिंती वा छत गळण्याने, खिडक्यांतून पाणी येण्याने, गळणाऱ्या भांड्यांमुळे किंवा पक्ष्यांच्या श्वासामुळे. त्यामुळे योग्य जलनिस्सारण व बांधकाम गरजेचे आहे.
प्रकाशाची गरज
नैसर्गिक प्रकाश हा कोंबड्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. सूर्यप्रकाशामुळे रोगजंतू नष्ट होतात, व्हिटॅमिन D मिळते आणि पक्षी आनंदी राहतात. कृत्रिम प्रकाशाचा वापरही शक्य असून, त्यानेही योग्य वेळेवर प्रकाश मिळतो.
स्वच्छतेचे महत्त्व
कोंबड्यांच्या घरात गोचिड, उवा, पिसवा यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमित स्वच्छता हवी. घराची रचना अशी असावी की ती सहज साफ करता येईल. बांधकामात लोह, सिमेंट-असबेस्टॉस किंवा धातूची पत्रे वापरणे चांगले. लाकूड वापरत असल्यास त्यावर कीटकनाशकांचे लेप द्यावे.
योग्य रचना आणि व्यवस्थापनामुळे पोल्ट्री हाउस अधिक उत्पादनक्षम व सुरक्षित ठरते. तुमचे पोल्ट्री युनिट सुरू करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास यश नक्कीच तुमच्या गाठीस येईल.
Mumbai,Maharashtra
May 04, 2025 12:20 PM IST
स्वच्छतेपासून ते जागेच्या निवडीपर्यंत! पोल्ट्री फार्म व्यवसाय यशस्वी करण्याचे 10 सोपे नियम