वाद का निर्माण झाला?
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. येथे दरवर्षी सुमारे 239 दशलक्ष टन दूध उत्पादन होते. याच्या तुलनेत अमेरिका 130 दशलक्ष टन उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, अमेरिकेतील मोठ्या प्रमाणावर औद्योगिक डेअरी शेती होते, जिथे एका उत्पादकाकडे शेकडो गायी असतात. यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादने स्वस्तात निर्यात करता येतात.
अमेरिका हेच स्वस्त उत्पादन भारतात विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारताने आयात शुल्क कमी करावे, असा अमेरिकेचा दबाव आहे. सध्या भारत डेअरी उत्पादनांवर उच्च आयात शुल्क लावतो, जे स्थानिक उद्योग आणि ग्रामीण शेतकऱ्यांचे रक्षण करते.
शेतकऱ्यांवरील परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेला धोका
भारतामध्ये दूध उत्पादन हे केवळ उद्योग नसून, ग्रामिण अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. लाखो छोट्या शेतकऱ्यांची उपजीविका थेट गायी–म्हशींच्या दुधावर अवलंबून आहे. सरासरी एका शेतकऱ्याकडे दोन ते तीन जनावरे असतात, जे त्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे.
काय परिणाम होणार?
स्वस्त डेअरी उत्पादने आयात झाली,तर स्थानिक दूध दर कोसळतील,शेतकऱ्यांचे उत्पन्न घटेल,
स्थानिक प्रक्रिया उद्योगही आयात मालाकडे वळतील,ग्रामीण बेरोजगारी वाढेल. तसेच डेअरी सहकारी संस्था आणि शेतकरी संघटनांनी याबाबत सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे.
सरकारची भूमिका काय?
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, भारत डेअरी आयातीसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही. मात्र, द्विपक्षीय करारांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा दबाव कायम आहे. भारताने यापूर्वीही अनेक करारांतून डेअरी उद्योगाला वगळले आहे आणि तशीच भूमिका पुढेही घेणे अपेक्षित आहे.
Mumbai,Maharashtra
June 03, 2025 8:30 AM IST
अमेरिकेचा भारताविरोधात नवीन डाव! महाराष्ट्रासह देशातील 8 कोटी शेतकऱ्यांचे होणार मोठं नुकसान