बावनकुळे यांनी शुक्रवारी मोझरी येथे आंदोलनकर्ते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली. कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी विविध मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा सहावा दिवस असल्याने स्वतः महसूलमंत्री भेटीसाठी पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती दिली.
कर्जमाफीसाठी ‘वर्गवारी’ आणि पात्रता ठरवणार
राज्यात याआधीही अनेक कर्जमाफी योजना राबवल्या गेल्या, मात्र त्यातील अनेक अंमलबजावणीत त्रुटी राहिल्या. यावर उपाय म्हणून यंदा सरकार शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन ‘वर्गवारी’ (Categorisation) करणार आहे. आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांऐवजी खरोखरच गरजू आणि मागास शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा, यासाठी समिती शिफारसी करेल.
“सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी निर्णय अहवालाआधारेच घेतले जातील. फसवणूक होऊ नये म्हणूनच सरकारची भूमिका वेगळी आहे,” असे बावनकुळे म्हणाले.
दिव्यांग मानधन आणि इतर मागण्यांवर लवकरच निर्णय
बच्चू कडू यांनी केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नव्हे, तर एकूण 17 मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करून ते 6,000 करण्याची मागणी महत्त्वाची आहे. यावर सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली असून, देशातील इतर राज्यांतील मानधनाचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
आंदोलन मागे घेण्याबाबत लवकरच निर्णय
बच्चू कडू यांनी सांगितले की, शासनाने काही मुद्द्यांवर सकारात्मक पाऊल उचलले आहे, परंतु आंदोलन थांबवायचा अंतिम निर्णय शनिवारी (ता.14) पदाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर घेतला जाईल.
बाकीच्या 15 मागण्या लवकरात लवकर संबंधित खात्यांच्या मंत्र्यांमार्फत निकाली काढण्यात येतील, अशी माहिती देत बावनकुळे यांनी बच्चू कडूंना लेखी आश्वासन दिले आहे.
Amravati,Maharashtra
June 14, 2025 9:00 AM IST
शेतकरी कर्जमाफी होणार! पण अटी काय असणार? मंत्री बावनकुळेंनी सविस्तर सांगितलं