विक्रमी आगमनानंतर काहीशी गती मंदावली
मॉन्सून यंदा विक्रमी गतीने 24 मे रोजी केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर दाखल झाला. 25 मे रोजी सिंधुदुर्गच्या देवगडपर्यंत पोहोचला आणि 26 मे रोजी मुंबई, पुणे व धाराशीव या भागात धडक दिली. 28 मेपर्यंत तो मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांमध्ये पोहोचला. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रावर कमी दाब क्षेत्राची अनुकूलता कमी झाल्याने मॉन्सूनची गती काही काळ थांबली होती.
आता मात्र या अडथळ्यावर मात करत मॉन्सूनने 17 जून रोजी अखेर उर्वरित विदर्भ आणि राज्याच्या उर्वरित भागात प्रवेश केला. याच वेळी गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा व पश्चिम बंगालच्या मोठ्या भागांतही त्याची प्रगती झाली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 18 जून रोजी कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा व कोल्हापूर घाटमाथा या भागांत मुसळधार सरींची शक्यता आहे.
तसेच मुंबई, ठाणे, आणि नाशिकच्या घाटमाथ्यालाही जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला गेला आहे. या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात काही भागांत जोरदार, काही ठिकाणी मध्यम पावसाची नोंद
मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत ब्रह्मपुरी (विदर्भ) येथे राज्यातील सर्वाधिक ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान, कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मध्यम पाऊस झाला असून, कोल्हापूरच्या राधानगरी आणि ठाण्याच्या भिवंडीमध्ये 130 मिमी इतका उच्चांकी पाऊस नोंदवण्यात आला.
पुढील काही दिवस हवामानात अस्थिरता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
राज्याच्या उत्तर भागांमध्ये आणि काही अंतर्गत जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत वादळी व विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai,Maharashtra
June 18, 2025 8:59 AM IST
कृषी हवामान : पेरणीचा निर्णय काळजीने घ्या! पाऊस पुन्हा झोडपणार, 16 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा