Last Updated:
Monsoon 2025 : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर काहीसा मंदावला होता, मात्र आजपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. पुणे, रायगड, नाशिकसह कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर काहीसा मंदावला होता, मात्र आजपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. पुणे, रायगड, नाशिकसह कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक ठप्प झाली आहे. नद्या धोका पातळी ओलांडत आहेत आणि जनजीवन विस्कळीत होत चालले आहे.
रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार
रायगड जिल्ह्यात आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, रोहा आणि सुधागड तालुक्यातील पाली-नागोठणे भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्याने आसपासच्या गावांमध्ये पाणी घुसले आहे. नागोठणे शहरात एसटी बस स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतर करत आहेत. पाली-खोपोली रस्ता बंद करण्यात आला आहे.
जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नगरपरिषदेने सायरन वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मटन मार्केट परिसरात पाणी घुसले असून, खाडी पट्ट्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे खेड शहराला संभाव्य पूराचा धोका आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस
पुणे शहर व परिसरात सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे 2000 क्युसेक पाणी मुळा-मुठा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भिडे पुलाच्या पायथ्याला पाणी पोहोचले असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. लोणावळा परिसरात मळवली-देवळे गावाचा संपर्क तुटला आहे. अनेक भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे.
नाशिकमध्ये गोदावरीची पुराच्या दिशेने वाटचाल
नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून, सकाळपासून अनेक भागात धारधार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, रामकुंड व गोदा घाट परिसर जलमय झाला आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले असून मुख्य चौकांमध्ये वाहतूक ठप्प झाली आहे. अर्ध्या तासात रस्ते जलमय झाल्याने शहरातील ड्रेनेज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. हवामान विभागाने नाशिकसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.
Mumbai,Maharashtra
June 19, 2025 3:41 PM IST
कृषी हवामान : पावसाचा रुद्रावतार! नाशिक, पुणेसह रायगडमध्ये नदी नाल्यांना पुराचे स्वरूप