कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
घाटमाथ्यावरही अलर्ट जारी
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याच्या घाटमाथ्याला, तसेच सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मराठवाड्यात उघडीप, काही भागांत हलक्या सरी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. छ. संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये केवळ हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात यलो अलर्ट
अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, या भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यात कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर दिसणार असला तरी, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उघडीप राहणार आहे. हवामानातील या बदलांमुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
Mumbai,Maharashtra
June 22, 2025 9:04 AM IST
कृषी हवामान : पेरण्या करताना काळजी घ्या! अतिमुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना IMD चा अलर्ट