Last Updated:
Agriculture News : पारंपरिक पिकांसोबत आता शेतकरी नवे प्रयोग करत असून, त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहेत. ड्रॅगन फ्रूट हे असंच एक फळ आहे, ज्याची लागवड करून महाराष्ट्रातील शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकतात.
मुंबई : पारंपरिक पिकांसोबत आता शेतकरी नवे प्रयोग करत असून, त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहेत. ड्रॅगन फ्रूट हे असंच एक फळ आहे, ज्याची लागवड करून महाराष्ट्रातील शेतकरी लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकतात. या फळाला बाजारात प्रचंड मागणी आहे. त्याची किंमतही चांगली मिळते आणि निर्यातीचीही संधी आहे.
ड्रॅगन फ्रूटला कमलम असेही म्हटले जाते. हे फळ मुख्यत्वे व्हिएतनाम, मलेशिया, थायलंडसारख्या देशांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, भारतातही आता ड्रॅगन फ्रूट लागवड झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रूट शेतीकडे वळत आहेत.
ड्रॅगन फ्रूट लागवडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक कमी पाण्यातही चांगले तग धरते. उष्ण आणि कोरड्या हवामानात या फळाचे उत्पादन चांगले होते. एका एकरात 2000 झाडांची लागवड करता येते. योग्य व्यवस्थापन केल्यास तिसऱ्या वर्षापासून दरवर्षी सुमारे 8-10 टन उत्पादन सहज मिळू शकते.
सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूटची घाऊक किंमत प्रति किलो 150-200 रुपये असते, तर किरकोळ विक्रीत 300 रुपयांपर्यंत दर मिळतो.अशा परिस्थितीत एका एकरातून वर्षाला किमान 12 ते 15 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी सुरुवातीला खांब बसवणे, रोपे विकत घेणे, सिंचन यंत्रणा बसवणे यासाठी काही खर्च येतो. पहिल्या वर्षी एकराला सुमारे 3-4 लाख रुपयांचा खर्च होतो. पण नंतरच्या वर्षांत खर्च खूपच कमी राहतो आणि उत्पन्न वाढते.झाडांचे आयुष्य साधारण 20-25 वर्षे असते,त्यामुळे दीर्घकाळापर्यंत नफा मिळत राहतो.
ड्रॅगन फ्रूट लागवडीत यशस्वी व्हायचे असेल, तर कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. जमिनीत पाणी न साचणारे चांगले निचरा असलेले क्षेत्र निवडणे आवश्यक असते. त्यासाठी नियमित छाटणी, खत व्यवस्थापन व कीड नियंत्रण महत्त्वाचे ठरते. योग्य काळजी घेतल्यास पहिल्या दोन वर्षांतच उत्पन्न सुरू होते.
भारताच्या बाजारासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही ड्रॅगन फ्रूटला मोठी मागणी आहे. निर्यातीमुळे दर जास्त मिळतात. त्यामुळे उत्पन्नात आणखी वाढ होते.
Mumbai,Maharashtra
June 28, 2025 5:43 PM IST