Last Updated:
Saur Krushi Pump Yojana : महाराष्ट्राने सौर कृषिपंप बसविण्यात देशात आघाडी घेतली असून, आतापर्यंत राज्यातील विविध योजनांतून सुमारे 5 लाख 65 हजार सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. येत्या काळात आणखी पाच लाख सौर कृषिपंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्राने सौर कृषिपंप बसविण्यात देशात आघाडी घेतली असून, आतापर्यंत राज्यातील विविध योजनांतून सुमारे 5 लाख 65 हजार सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. येत्या काळात आणखी पाच लाख सौर कृषिपंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत. या सौर पंपांच्या देखभाल आणि तक्रार निवारणासाठी महावितरणकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मे महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सौर पॅनेल्सचे नुकसान झाले. तसेच काही भागांत सौर पंपांनी काम करणे बंद केले किंवा कमी दाबाने पाणी येऊ लागले. या समस्यांवर त्वरीत उपाययोजना करण्यासाठी महावितरणने व्यापक सुविधा सुरू केल्या आहेत.
महावितरणने शेतकऱ्यांना घरबसल्या तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक तसेच ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सौर पॅनेल तुटणे, चोरी होणे, पंप न चालणे, ऊर्जा संच काम न करणे, पाण्याचा दाब कमी होणे अशा कोणत्याही समस्यांवर त्वरित कारवाई केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना तक्रार नोंदवताना फक्त लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा, तालुका, गाव व नावाची माहिती दिल्यासही तक्रार स्वीकारली जाईल.
महावितरणने स्पष्ट केले आहे की सौर कृषिपंप बसविल्यानंतर पुढील पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवरच राहील. त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे खर्च करावा लागणार नाही. तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसांत दुरुस्ती पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व कंत्राटदार कंपन्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये सेवा केंद्र स्थापन करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींची कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्यांना मोबाइलवर संदेश पाठविला जाईल.
महावितरणच्या प्रत्येक मंडलाचे अधीक्षक अभियंते या तक्रारींची आणि कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीची देखरेख करतील. याबाबत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत.
महावितरणच्या सौर कृषिपंपांबाबत कोणतीही तक्रार असल्यास शेतकरी खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात
टोल फ्री क्रमांक
1800-233-3435
1800-212-3435
महावितरणच्या संकेतस्थळावर सर्व 44 पुरवठादार कंपन्यांच्या लिंक एकत्रित उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तिथेही तक्रार नोंदवता येईल.
महावितरणकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणतीही अडचण आल्यास या सुविधा त्वरित वापरून तक्रारी नोंदवाव्यात आणि आपला हक्क सुरक्षित ठेवावा.
Mumbai,Maharashtra
June 30, 2025 12:15 PM IST
सौर कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी महावितरणचा महत्वाचा निर्णय! वाचा सविस्तर