जालना: एप्रिल-मे महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. वातावरणीय बदल आणि अवकाळी पावसामुळे मिरची पिकावर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी मिरचीचे उत्पादन घेतात. परंतु रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना झालेला खर्च वसूल करणे देखील मुश्किल झाला आहे.
जिल्ह्यातील जाफराबाद–भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेकडो एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली आहे. मिरचीचे रोप हे फेब्रुवारी महिन्यापासून तयार करण्यास सुरुवात केली जाते. रोप तयार झाल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला त्याची शेतामध्ये लागवड केली जाते.
लागवड करताना ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्याचबरोबर विविध कीटकनाशके आणि पोषक द्रव्यांच्या फवारण्या, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर यामुळे मिरची तसे खर्चिक पीक आहे. एका एकर मिरचीसाठी साधारणपणे 80 हजार ते 1 लाख रुपये एवढा खर्च होतो. मिरचीला चांगला दर मिळाल्यास एका एकरातून तीन–चार लाखांचं उत्पन्न देखील मिळतं.
परंतु यंदा वातावरणीय बदल आणि मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यामुळे हे पीक कोकडा या रोगाने रोगग्रस्त झाला आहे. त्यामुळे यंदा झालेला खर्च काढणे देखील मुश्किल आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती औषधे फवारावी याबाबत आम्हाला फारशी माहिती नाही. कृषी अधिकारी देखील मार्गदर्शन करत नाहीत, असं शेतकरी सागर देशमुख यांनी लोकल 18 बरोबर बोलताना सांगितलं.
मी दुसऱ्याच्या शेतामध्ये हिस्सेवारीने मिरचीची लागवड केलेली आहे. मिरचीला 80 हजारापर्यंत खर्च केलाय. आता एकच तोडा केला आहे. त्याचे दहा–बारा हजार रुपये आलेत. परंतु संपूर्ण प्लॉटवर आता कोकडा रोग आलाय. यामुळे पिकाची वाढ खुंटली. हा संपूर्ण प्लॉट उकडून काढण्याशिवाय पर्याय नाही. हा प्लॉट उपटून काढण्यासाठी देखील दहा–बारा हजारांचा खर्च आहे, असं शेतकरी राम क्षीरसागर यांनी सांगितलं.