हुमणी अळी बहुभक्षी असून तिचं जीवनचक्र साधारण एक वर्षाचं असतं. पावसाळ्यात प्रौढ मादी मातीमध्ये 40 ते 50 अंडी घालते. 3 ते 5 दिवसांत त्यातून बारीक पिवळसर अळ्या बाहेर पडतात. सुरुवातीला या अळ्या गवताच्या मुळांवर जगतात. पूर्ण वाढलेली अळी 3 ते 5 सेंमी लांब, मळकट पांढरी आणि “C” आकाराची दिसते. अळी अवस्था साधारण 6 ते 8 महिने असते आणि या काळात खरीप व रब्बी पिकांच्या मुळांवर उपजीविका करत मोठं नुकसान करते.
या किडीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका, गहू, ऊस, भात, वांगी, करडई, मिरची, सूर्यफूल यासह अनेक पिकांच्या मुळांचा फडशा पडतो. मुळे खाल्ल्यामुळे झाडांची पाने पिवळी पडतात व झाडे मुळासकट उपटून सुकून पडतात.
शेतात निरीक्षण करताना एकरी 20 ठिकाण मातीचे नमुने (1 फूट x 1 फूट x 6 इंच खोल) घ्या व अळ्या शोधा. तसेच पिकात विशिष्ट ओळीतील झाडं पिवळी पडली, कोलमडली दिसल्यास ती मुळासकट उपटून तपासा. मुळं कुरतडलेली असतील तर हुमणीचा प्रादुर्भाव असल्याचं निश्चित होतं.
नियंत्रणासाठी महत्त्वाच्या उपाययोजना
पाऊस पडल्यावर सायंकाळी कडुलिंब, बाभुळ, बोर झाडांची तपासणी करा.
झाडाखाली प्रकाश सापळे लावावेत. प्रत्येक झाडावर भुंग्यांची संख्या 20 पेक्षा जास्त असेल,तर फवारणी करावी. पहिली फवारणी सातत्याने हुमणी येणाऱ्या भागात करावी. दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 3 आठवड्यांनी करावी.
सौम्य प्रादुर्भाव असेल तर मेटॅरायझियम ही मित्र बुरशी ४ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून मुळाशी आळवणी करावी. किंवा 1 किलो मेटॅरायझियम 100 किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टर फेकावे.
लक्षणीय प्रादुर्भाव असेल, तर पुढील उपाय करावे फिप्रोनील 40% + इमिडॅक्लोप्रिड 40% दानेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून झाडांच्या खोडांजवळ टाकावे. कार्बोफ्यूरॉन 3% दानेदार 33.20 किलो प्रति हेक्टर मातीत मिसळावे. थायोमेथोक्झाम 0.4% + बायफेनथ्रिन 0.8% दानेदार 12 किलो प्रति हेक्टर. थायोमेथोक्झाम 0.9% + फिप्रोनील 2% दानेदार 12–15 किलो प्रति हेक्टर ओलसर जमिनीत खोडांजवळ टाकावे.
Mumbai,Maharashtra
July 01, 2025 3:40 PM IST