रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात सध्या जमीन ओलसर असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जिल्ह्यांमध्ये सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत या भागात पावसाने हजेरी लावल्याने नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे अधिक पाऊस झाल्यास पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते. शेतकऱ्यांनी पेरणीची कामे वेळीच उरकावी आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांना हवामान विभागाने बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात या भागात तुरळक पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळालं होतं. मात्र पुढील काळात मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान होऊ शकते.
मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेने कमी राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असं हवामान विभागानं सांगितलं आहे. या भागातील शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे, कारण पेरणीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा काळ आहे.
विदर्भात मात्र पावसाने पाठ फिरवल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत वाढणारे तापमान आणि उकाड्यामुळे जनजीवन हैराण झाले आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
मुंबईत बुधवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी शहराच्या काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या, परंतु मंगळवारी दिवसभर पाऊस पडला नाही. त्यामुळे नागरिकांना दमट वातावरणाचा सामना करावा लागत आहे. पुण्यातही हलक्या सरी कोसळतील असं सांगितलं जात असून नागरिकांनी गरजेनुसार खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्याच्या विविध भागांत पावसाची स्थिती वेगळी असली तरी पुढील काही दिवस पावसाने धडक दिल्यास शेती, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Mumbai,Maharashtra
July 02, 2025 8:33 AM IST
कृषी हवामान : पावसाचा जोर वाढला! पुढील 4 दिवस धुमाकूळ घालणार, या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा