Last Updated:
Saur Krushi Pump Yojana : राज्यात आतापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून 5 लाख 65 हजार सौर कृषी पंपांची स्थापना करण्यात आली आहे.
पुणे : राज्यात आतापर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून 5 लाख 65 हजार सौर कृषी पंपांची स्थापना करण्यात आली आहे. सौर पंप वापरात आल्यानंतर बिघाड, नुकसान किंवा इतर तक्रारींवर त्वरित कारवाई व्हावी, यासाठी महावितरणने आता शेतकऱ्यांना मोबाइल अॅपद्वारे तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांना तक्रारी नोंदविण्यासाठी तीन पर्याय होते जसे की, महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार अर्ज भरणे, संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करणे, तसेच टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवणे. याशिवाय,आता महावितरणच्या मोबाइल अॅपमधूनही थेट तक्रार पाठवता येणार आहे.
महावितरणचे अॅप राज्यातील वीज ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरले असून, वीज बिल पाहणे, बिल भरणे, मीटर रीडिंग नोंदवणे, वीज चोरीची माहिती देणे किंवा खराब ट्रान्स्फॉर्मरबद्दल कळविणे अशा विविध सेवांसाठी नागरिक हे अॅप मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. आता त्याच अॅपमध्ये ‘सौर पंप तक्रार’ हा पर्याय देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवताना सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे. त्यात खालील पैकी तक्रारी नोंदवता येतील
पंप सुरू न होणे.
सौर पॅनलचे तांत्रिक नुकसान.
ऊर्जा संच कार्यरत न राहणे.
पंपातून पाण्याचा कमी दाब.
सौर पॅनल किंवा पंप चोरी.
अशा कोणत्याही समस्यांबाबत शेतकरी तक्रार दाखल करू शकतात.
प्रत्येक सौर कृषी पंप संचाचा विमा उतरवण्यात आला असून, पंप बसविल्यानंतर पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर राहणार आहे.
तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक पुरवठादार कंपनीला त्यांनी पंप बसविलेल्या जिल्ह्यात सेवा केंद्र सुरू करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तक्रार सोडवल्यानंतर शेतकऱ्याला त्यांच्या मोबाइलवर संदेश पाठवण्यात येईल. संपूर्ण प्रक्रियेवर संबंधित मंडलाचे अधीक्षक अभियंते देखरेख ठेवतील.
Mumbai,Maharashtra
July 03, 2025 9:59 AM IST