Last Updated:
Agriculture News : राज्यातील वीज ग्राहकांना पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी महावितरणने राबवलेल्या गो-ग्रीन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत छापील कागदी वीजबिल बंद करून फक्त ई-मेल आणि एसएमएसद्वारे बिल देण्याची सुविधा निवडता येते.
पुणे : राज्यातील वीज ग्राहकांना पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी महावितरणने राबवलेल्या गो-ग्रीन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत छापील कागदी वीजबिल बंद करून फक्त ई-मेल आणि एसएमएसद्वारे बिल देण्याची सुविधा निवडता येते. या पर्यायाचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या आता झपाट्याने वाढली असून, आतापर्यंत 5 लाख 3 हजार 795 ग्राहकांनी ही योजना स्वीकारली आहे.
महावितरणच्या अधिकृत आकडेवारीनुसार, या उपक्रमामुळे केवळ ग्राहकांनाच आर्थिक फायदा होत नाही, तर कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरणाला मोठा हातभारही लागत आहे. या पर्यायामुळे वीज ग्राहकांना दरवर्षी मिळणारी एकूण सवलत 6 कोटी 4 लाख 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
वीजबिल तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कागदाचा वापर होतो. हे बिल घरी पोहोचवण्यासाठी वेळ आणि इंधन खर्चही होतो. यामुळेच महावितरणने ‘गो-ग्रीन’ उपक्रम हाती घेतला असून, ग्राहकांनी कागदी बिलाऐवजी डिजिटल स्वरुपात ई-मेल व एसएमएसद्वारे बिल मिळवावे, असे आवाहन केले आहे.
या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना आर्थिक प्रोत्साहन म्हणून दर महिन्याला 10 रुपये सवलत दिली जाते. म्हणजेच ग्राहकांचा वार्षिक 120 रुपयांचा बचत होतो. विशेष म्हणजे, या पर्यायाची निवड केल्यानंतर पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील 12 महिन्यांची एकरकमी सवलत म्हणजे 120 रुपये ग्राहकाच्या खात्यावर जमा केली जाते. त्यामुळे कागदाचा अपव्यय टाळून थेट बिलातून फायदा मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळते.
या योजनेत राज्यभरातील ग्राहक सहभागी होत असले तरी पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे. एकट्या पश्चिम महाराष्ट्रातील 2 लाख 1 हजार 233 ग्राहकांनी हा पर्यावरणपूरक पर्याय निवडला आहे. या ग्राहकांना एकूण 2 कोटी 42 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.
संपूर्ण राज्यातील आकडेवारी पाहिल्यास, उर्वरित भागातीलही लाखो ग्राहकांनी ही सवलत मिळवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कागदाची बचत झाली असून, महावितरणच्या मते, हा उपक्रम हरितऊर्जा आणि पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
गो-ग्रीन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ग्राहकांना महावितरणचे अधिकृत मोबाइल अॅप किंवा संकेतस्थळावर लॉगिन करून आपला वीज ग्राहक क्रमांक व नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून पर्याय निवडता येतो. तिथे ‘गो-ग्रीन’ योजना निवडून ई-मेल व एसएमएसद्वारे बिल मिळवण्याची सहमती द्यावी लागते.
Mumbai,Maharashtra
July 03, 2025 11:06 AM IST