Last Updated:
Agriculture News : ग्रामीण भागात जमिनीच्या मालकीबाबत वाद वाढत आहेत. अनेकवेळा शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असल्याचे पुरावे असतात, तरीही शेजारी त्या जमिनीवर हक्क सांगत ताबा सोडायला नकार देतात.
मुंबई : ग्रामीण भागात जमिनीच्या मालकीबाबत वाद वाढत आहेत. अनेकवेळा शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन असल्याचे पुरावे असतात, तरीही शेजारी त्या जमिनीवर हक्क सांगत ताबा सोडायला नकार देतात. अशावेळी कायद्यानं आपली जमीन पुन्हा मिळवण्यासाठी काही ठोस उपाय करता येतात.
सुरुवातीला लक्षात घ्या की, सातबारा उतारा (7/12), फेरफार नोंद (फेरफार पत्रक), मिळकत नोंद (8 अ उतारा), मिळकत दाखला, जुने खरेदीखत, वारस नोंद हे सर्व कागदपत्रे तुमचा मालकी हक्क सिद्ध करणारे महत्त्वाचे पुरावे असतात. या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही महसूल विभाग किंवा न्यायालयाकडे दाद मागू शकता.
कायदेशीर मार्ग काय?
सर्वप्रथम तुमच्या गावच्या तलाठ्याकडे तक्रार अर्ज करा. अर्जात जमीन क्रमांक, क्षेत्रफळ, आणि शेजाऱ्याने अडवणूक केल्याचे स्पष्ट नमूद करा. तलाठी पंचनामा करून सीमांकन करेल आणि ताब्याबाबत अहवाल तयार करेल.
तुमच्या जमिनीचे सीमांकन महसूल कार्यालयात अर्ज करून करून घ्या. सीमांकनानंतर कोणत्या जागेवर तुमचा हक्क आहे हे स्पष्ट होते. सीमांकन अहवालात तुमचा हिस्सा ठरला, तरी शेजारी ताबा देत नसेल तर पुढची पायरी घ्या.
सीमांकनाचे आदेश असतानाही शेजारी अडथळा आणत असेल, जमीन ताब्यात येऊ देत नसेल, तर स्थानिक पोलिसांकडे लेखी तक्रार करा. पोलीस प्रशासन जमिनीचा ताबा देण्यासाठी पंचनामा करून तुम्हाला मदत करू शकते.
जर शेजाऱ्याने तुमच्या जमिनीवर बांधकाम केले असेल किंवा शेती वापर सुरू ठेवला असेल, तर महसूल विभाग किंवा न्यायालयाकडे “अतिक्रमण हटाव” मागणी करा. तहसीलदारांकडे अतिक्रमण काढण्यासाठी आदेश मिळवता येतात.
ताबा घेण्यासाठी विरोध होण्याची शक्यता असल्यास, महसूल अधिकारी किंवा कोर्टाच्या आदेशासोबत पोलीस संरक्षण मिळवता येते. शेतजमिनीच्या मालकी व ताब्यासंदर्भात कोणतीही तडजोड न करता कायदेशीर मार्ग अवलंबणे हेच सर्वोत्तम उपाय आहे. फसवणूक अथवा बेकायदेशीर ताब्यासंदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हाही नोंदवता येतो.
Mumbai,Maharashtra
July 07, 2025 2:35 PM IST
शेजाऱ्याने तुमची जमीन हडपलीये का? मालकी हक्क देण्यास नकार, मग ‘हा’ पर्याय वापराच