तलाठी हा महसूल विभागातील एक महत्त्वाचा अधिकारी असून त्याच्यावर पुढील जबाबदाऱ्या असतात. जसे की,
1) सातबारा उतारा व 8 अ मध्ये नोंदी करणे
2)उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास, जात प्रमाणपत्रासाठी शिफारस
3) पिक पाहणी अहवाल
4) खातेफोडसाठी अहवाल तयार करणे
5) जमिनीच्या मालकी हक्काबाबतची नोंदणी
6) तलाठ्यांनी नागरिकांची कामं विलंब न करता, पारदर्शकपणे आणि नियमांनुसार वेळेत पार पाडणे आवश्यक असते.
जर तलाठी तुमचे काम वारंवार टाळत असेल, योग्य माहिती देत नसेल किंवा जबाबदारीपासून पळ काढत असेल, तर खालील टप्प्यांनुसार तक्रार करता येते
संबंधित तलाठी कार्यरत असलेल्या तहसीलदार कार्यालयात तक्रार अर्ज सादर करा.
अर्जात तुमचं नाव, पत्ता, तक्रारीचा तपशील, तारीख, संबंधित तलाठ्याचं नाव, कामाचा प्रकार आणि किती वेळ लांबवण्यात आलं याचा उल्लेख करा. हे तक्रार अर्ज स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे देता येतो.
mahasamadhan.maharashtra.gov.in या पोर्टलवर जाऊन तलाठ्यांविरोधात ऑनलाइन तक्रार करता येते. “लोकशाही दिन” किंवा “ग्राम संवाद” योजनेच्या माध्यमातूनही तक्रार करता येते. तक्रार नोंदवताना तुमचं मोबाईल नंबर, आधार क्रमांक आणि तक्रारीचा संपूर्ण तपशील देणे आवश्यक असते. नोंदणीनंतर तुम्हाला एक तक्रार क्रमांक मिळतो, ज्याद्वारे तुम्ही प्रकरणाच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकता.
तहसील स्तरावर योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर तुम्ही उपविभागीय अधिकारी (SDO) किंवा जिल्हाधिकारी (Collector) यांच्याकडे अपील करू शकता. यासाठी पूर्वीच्या तक्रारीच्या प्रत, पुरावे (जसे की अर्जाची प्रत, भेटलेले वेळ, संभाषणाचा नोंद, इ.) सादर करणे उपयुक्त ठरते.
माहितीचा अधिकार कायदा (RTI) – तलाठ्याच्या कामांबाबत माहिती मिळवण्यासाठी RTI अंतर्गत अर्ज करून माहिती मागवता येते.
लोकसेवा हमी कायदा – महाराष्ट्र राज्याने ठराविक कालावधीत शासकीय सेवा देण्याची हमी दिली आहे. तलाठ्याचे काम जर त्या वेळेत नसेल, तर कायदेशीर कारवाईस पात्र ठरतो.
दरम्यान, सरकारने तक्रारीसाठी आवश्यक पोर्टल्स आणि कायदेशीर रचना उपलब्ध करून दिली आहे, ज्याचा योग्य वापर जनता करू शकते.
Mumbai,Maharashtra
July 08, 2025 1:44 PM IST