Last Updated:
Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणाऱ्या पिक विमा योजनांबाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणाऱ्या पिक विमा योजनांबाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 2024 च्या खर्चाचा उर्वरित भाग तसेच 2025-26 च्या खरीप हंगामासाठीच्या सुधारित पीक विमा योजनेसंदर्भात तिन्ही महत्त्वाचे शासन निर्णय (जीआर) निर्गमित करण्यात आले आहेत. या अंतर्गत राज्य शासन आणि शेतकऱ्यांचा हिस्सा मिळून 275 कोटींपेक्षा अधिक रक्कम पिक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य शासनाने रब्बी हंगाम 2024-25 अंतर्गत पिक विमा योजनेंतर्गत उर्वरित असलेला हिस्सा 207 कोटी 5 लाख 80 हजार 776 रुपये विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये 9 पिक विमा कंपन्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा हिस्सा देखील मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी 15 कोटी 59 लाख 71 हजार 986 रुपये विमा कंपन्यांना देण्यात येणार आहेत.
गेल्या हंगामात, विशेषतः नांदेड, सोलापूर, परभणी आदी जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, विमा लाभाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या निधीमुळे तत्काळ मदत मिळण्याची शक्यता आहे. ही योजना ‘एक रुपयात पीक विमा’ या संकल्पनेतून राबवण्यात आली होती.
राज्य शासनाने खरीप 2025-26 हंगामात राबवण्यात येणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेसाठी पहिल्या हप्त्याचा अग्रिम निधी जाहीर केला आहे. या योजनेअंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी आणि ICICI लोम्बार्ड या दोन विमा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शासनाने अंमलबजावणीसाठी 1,530 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला आहे.
या तिन्ही जीआरमध्ये 2024 चा शिल्लक असलेला हिस्सा म्हणजे राज्य शासनाचा 260 कोटी रुपये आणि शेतकऱ्यांचा 15.60 कोटी रुपयांचा निधी देखील विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पूर्वी मंजूर झालेल्या, परंतु वितरण प्रलंबित असलेल्या निधीच्या अडचणी दूर होतील आणि शेतकऱ्यांना वेळेत विमा लाभ मिळेल.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विमा भरपाईसाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे. सुधारित पिक विमा योजना आणि शेतकऱ्यांच्या सहभागाचा हिस्सा शासनाने वेळेत वितरित केल्याने खरीप हंगाम 2025 साठी विश्वासार्ह आणि पारदर्शक व्यवस्था उभारली जात आहे.
Mumbai,Maharashtra
July 08, 2025 10:58 AM IST