Last Updated:
Agriculture News : गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना अखेर बोनसचा मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने गोंदिया जिल्ह्यासाठी 180 कोटी 63 लाख 56 हजार रुपये एवढा निधी मंजूर केला असून, लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना अखेर बोनसचा मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने गोंदिया जिल्ह्यासाठी 180 कोटी 63 लाख 56 हजार रुपये एवढा निधी मंजूर केला असून, लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ
गोंदिया जिल्ह्यात ऑनलाइन नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्रांवर धान विक्री केलेल्या सुमारे एक लाख 56 हजार शेतकऱ्यांना या निधीचा थेट लाभ मिळणार आहे. हिवाळी अधिवेशन 2024 दरम्यान सरकारने प्रति हेक्टर 20,000 रुपयांच्या बोनस योजनेची घोषणा केली होती. मात्र, यासाठीच्या प्रशासकीय आदेशांना आणि निधीच्या मंजुरीला तब्बल तीन-तीन महिने लागले.
उशीरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
सुरुवातीला बोनससंदर्भातील आदेश उशिरा निघाल्याने आणि त्यानंतर निधी मंजूर होण्यासाठी अधिक वेळ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली होती. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला होता. शेतकऱ्यांच्या या समस्या ओळखून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तातडीने निधीची तरतूद करण्याची मागणी केली होती.
उपमुख्यमंत्र्यांची तत्परता आणि निर्णय
या बैठकीत अजित पवार यांनी मार्केटिंग फेडरेशनसाठी 100 कोटी रुपये तत्काळ वितरित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी (ता. 14 जून) शासनाने बोनससाठीचा निधी फेडरेशनच्या खात्यात वर्ग केला.
18 जूनपासून खात्यावर रक्कम जमा होणार
18 जूनपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बोनस जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हा निधी उपलब्ध होणार असल्याने बियाणे, खते, मशागत यासाठी शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
Mumbai,Maharashtra
June 16, 2025 10:40 AM IST
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या तारखेपासून बोनसचे पैसे खात्यात जमा होणार