हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात राज्यात आणखी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, त्यामुळे महाराष्ट्रात 19 ते 25 मेदरम्यान पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, 17 ते 20 मेदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाचे संकेत मिळत आहेत.
मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रविवारी सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याच्या माहितीनुसार, गुजरात आणि उत्तर कोकण किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे सक्रिय झाले असून, याचा परिणाम म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघर भागात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गडगडाटासह पाऊसही कोसळू शकतो. शनिवारी वांद्रे, अंधेरी, बोरिवली, खार आणि गोरेगावसारख्या भागात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.
विदर्भात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 17 ते 19 मेदरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका असण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातही वीज व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नागरिक व शेतकऱ्यांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
अकोला जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, जनावरे झाडांखाली किंवा विजेच्या तारेजवळ बांधू नका. पावसात किंवा विजेच्या गडगडाटाच्या वेळी मोबाईलचा वापर टाळावा, आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai,Maharashtra
पावसाचं थैमान,शेतकरी हैराण! पुढील 3 दिवस धोक्याचे, या भागांना बसणार सर्वाधिक फटका