Last Updated:
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दुकानदार आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने 10 भरारी पथके तयार केली आहेत.
छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांना योग्य बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेत उपलब्ध व्हावीत तसेच त्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने चांगलीच कंबर कसली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दुकानदार आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने 10 भरारी पथके तयार केली आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी कृषी विभागाने 10 भरारी पथके तयार केली असून, या माध्यमातून विक्रेत्यांची सखोल तपासणी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात कृषी भरारी पथकाने कारवाई केली आहे आणि 44 दुकानांचे परवाने देखील निलंबित केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक कराल तर परवाना रद्द करून दुकान बंद होईल, असा थेट इशारा देखील कृषी विभागाने दिला आहे.
खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा बनावट माल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला असून, कृषी भरारी पथकाकडून नमुने गोळा करणे, तपासणी अहवाल तयार करणे आणि तात्काळ कारवाई करणे अशी कामगिरी केली जात आहे. यातून शेतकऱ्यांना सढळ मदत होत असून, बोगस माल विक्रेत्यांचे थेट परवाने रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे कायदेशीर कारवाईला गती मिळाली आहे.
अनुदानित रासायनिक खतांची विक्री करताना विविध प्रकारचे खते खरेदीसाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करू नये, असे निर्देश परवानाधारकांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच बियाणे, खते आणि कीटकनाशक खरेदी करावे. दुकानदारांकडून पावती घ्यावी. शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार असेल तर तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी केले आहे.
Aurangabad,Maharashtra
June 02, 2025 12:14 PM IST
Agriculture News: दुकानदारांनो सावधान! खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात, कृषी विभाग ॲक्शन मोडवर