Last Updated:
Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करत माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे.
अमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करत माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी थेट गोंधळ घालत सरकारविरोधी नाराजी व्यक्त केली.
आंदोलनाचे स्वरूप तीव्र
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि शेतकरी विविध ठिकाणी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या उदासीनतेचा निषेध केला.
बच्चू कडूंचा इशारा
सरकारच्या दिरंगाईवर रोष व्यक्त करत बच्चू कडू यांनी थेट जलत्यागाचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलं की, “कर्जमाफीचा निर्णय आतापर्यंत व्हायला हवा होता. सरकार फक्त बोलतंय, पण ठोस पाऊल उचलत नाही. अहवाल कुठं आहे? तारीख सांगत नाहीत. निर्णयच होत नाहीय. मी आंदोलन करत आहे कारण माझ्या कार्यकर्त्यांवर आक्रमण होतंय, शेतकरी त्रस्त आहे आणि सरकार शांत आहे. आता जर 16 तारखेपर्यंत निर्णय झाला नाही, तर मी जलत्याग करणार आहे.”
कार्यकर्त्यांना संयमाचे आवाहन
आंदोलनाची तीव्रता वाढत असली तरी बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलं की,
“आज निर्णय होईपर्यंत कुणीही आक्रमक पाऊल उचलू नये. आपण लढतो आहोत शेतकऱ्यांसाठी, पण शिस्तीने. पोलिस बंदोबस्त लावतात म्हणून आमचं आंदोलन थांबणार नाही. रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदाच मरण परवडेल, ही भावना आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.”
Amravati,Maharashtra
June 14, 2025 12:57 PM IST