Last Updated:
मुस्लिम बांधवांचा ईद-उल-अजहा म्हणजे बकरी ईद अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे. तौफिक कल्याणी यांनी तब्बल 190 किलोचा शिरोळी जातीचा बोकड आणला आहे.
सोलापूर : मुस्लिम बांधवांचा ईद-उल-अजहा म्हणजे बकरी ईद अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधव कुर्बानी देण्यासाठी बकऱ्यांची खरेदी करत आहेत. दुसरीकडे सोलापूर शहरातील मंगळवार बाजार येथे राहणाऱ्या तौफिक कल्याणी यांनी तब्बल 190 किलोचा शिरोळी जातीचा बोकड आणला आहे. या संदर्भात अधिक माहिती तौफिक कल्याणी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर शहरातील मिरची व्यापारी तौफिक कल्याणी यांनी मध्य प्रदेश येथील इंदूर जवळ असलेल्या देवास या गावातून शिरोळी या जातीचा बोकड आणला आहे. हा बोकड दिसायला सुंदर आहे, तर वजनाला तब्बल 190 किलोचा आहे. शिरोळी जातीचा हा बोकड असून सोलापूर शहरातील सर्वात जास्त वजन असणारा बोकड असल्याचा दावा मिरची व्यापारी तौफिक कल्याणी यांनी केला आहे.
दररोज या बोकडाला खाण्यासाठी मक्का, गहू, ज्वारी, पिंपळाचे पान, कडबा आणि दररोज संध्याकाळी 2 लीटर दूध पिण्यासाठी देत आहेत. हा बोकड पाहण्यासाठी सध्या व्यापारी तौफिक कल्याणी यांच्या घरी नागरिक गर्दी करत आहेत. शिरोळी जातीचा 190 किलो असणारा बोकड विक्री करणार नसल्याचे कल्याणी यांनी सांगितले. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बोकडची किंमत जवळपास 3 ते 4 लाख रुपयेपर्यंत आहे.
मुस्लिम बांधव या सणाला प्रामुख्याने बकऱ्याची कुर्बानी देतात. सोलापूर जिल्ह्यात मंगळवार बाजार, मार्केट यार्ड समोर, मंद्रूप, मोहोळ, कामती, सांगोला, बेगमपुर तसेच मोडनिंब या ठिकाणी बोकड खरेदी–विक्री करण्याचा बाजार भरत आहे. तर या ठिकाणी शिरोही, तोतापुरी, राजस्थानी, अजमेरी, कोठा, उस्मानाबादी आदी जातींची बोकड विक्रीसाठी व्यापारी आणत आहेत. तर काही मुस्लिम बांधव कुर्बानीसाठी मेंढ्यांची देखील खरेदी करत असताना दिसत आहेत.
Solapur,Maharashtra
June 05, 2025 10:41 PM IST
Bakrid 2025: अबब, तब्बल 190 किलो वजनाचा बोकड, किंमत 4 लाख, सोलापुरात बघायला लागल्या रांगा…