कायदा काय सांगतो?
भारतीय वारसा कायद्यानुसार (Hindu Succession Act, 1956), मालमत्तेच्या वारसाची व्याख्या विशिष्ट निकषांवर आधारित आहे. जर सासरे जिवंत असतील आणि त्यांच्या नावावर जमीन आहे, तर त्यांच्याच मालकी हक्कात ती जमीन राहते. त्यांच्या मृत्यूनंतर केवळ त्यांच्या कायदेशीर वारसांनाच त्या मालमत्तेवर अधिकार मिळतो. उदा. त्यांचे मूल (मुलगा, मुलगी), पत्नी, आई वगैरे.
मुलीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेवर कायदेशीर अधिकार असतो, मात्र तिच्या पतीला म्हणजे जावयाला.थेटपणे कोणताही हक्क मिळत नाही. जावई हा “वारसदार” म्हणून कायद्यात समाविष्ट नाही.
जमिनीवर शेती केली म्हणून हक्क मिळतो का?
काही वेळा जावई आपल्या सासऱ्याच्या जमिनीवर अनेक वर्षे शेती करत असतो, खर्च करतो, सुधारणा करतो. त्यामुळे “मी इतकी वर्षे केली आहे, जमीन माझी झालीच पाहिजे,” अशी अपेक्षा ठेवतो. मात्र, हे व्यवहार ‘तोंडी’ किंवा ‘नातेसंबंधावर आधारित’ असतील, तर त्यांना कायदेशीर वैधता नाही.
शेतजमिनीच्या मालकी हक्कासाठी कोणतेही दस्तऐवज जसे की, (खरेदीपत्र, बक्षीसपत्र, ताबा दाखला) आवश्यक असतात. केवळ तोंडी मान्यता किंवा तात्पुरता वापर या आधारे कोणीही जमीन आपली असल्याचा दावा करू शकत नाही.
जावई काय करू शकतो?
लेखी करार (Agreement)
जर सासऱ्याने जावयाला शेती करण्यास परवानगी दिली असेल, तर त्याचे लेखी करार करणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात वाद टाळता येऊ शकतो.
बक्षीसपत्र (Gift Deed)
सासऱ्याने स्वतःहून जावयाला मालमत्ता द्यायची असल्यास, त्यासाठी बक्षीसपत्र करून नोंदणी करणे आवश्यक आहे.
वसीयत (Will)
सासरे आपल्या इच्छेनुसार वसीयत करून जावयाला मालमत्ता देऊ शकतात. मात्र, ती वसीयत कायदेशीर दृष्टीने वैध असणे आवश्यक आहे.
नियम तोडल्यास काय होऊ शकते?
जर जावयाने सासऱ्याच्या जमिनीवर जबरदस्तीने हक्क सांगितला, जमीन ताब्यात घेतली किंवा नोंदणी केली, तर सासरे त्याच्याविरोधात फसवणूक, जबरदस्ती किंवा बेकायदेशीर अतिक्रमण यासारख्या गुन्ह्यांची तक्रार दाखल करू शकतात. अशा वेळी कायद्याने कारवाई होऊ शकते.
Mumbai,Maharashtra
June 03, 2025 12:31 PM IST
लाडका जावई सासऱ्यांच्या शेतजमीन,मालमत्तेवर हक्क सांगू शकतो का? नियम काय आहेत?