Last Updated:
Agriculture News : राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 20 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे.
मुंबई : राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 20 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हा निधी सर्व विभागीय आयुक्तांना वितरीत करण्यात आला असून, यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे अनेक कारणे आहेत अनियमित पर्जन्यमान, अवकाळी पाऊस, कीड वा रोगराईने पीक नष्ट होणे, सावकारांचे कर्ज, बाजारातील दरातील घसरण आणि आर्थिक ताण यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अशा संकटग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासन दरवर्षी काही विशिष्ट निधी वितरीत करत असते. यंदा त्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तो लवकरच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित वारसांना दिला जाणार आहे.
अमरावतीला सर्वाधिक मदत
विभाग मंजूर निधी (रु.)
कोकण 12 लाख
पुणे 1 कोटी 6 लाख
नाशिक 3 कोटी 39 लाख
छत्रपती संभाजीनगर 4 कोटी 92 लाख
अमरावती 6 कोटी 76 लाख
नागपूर 3 कोटी 75 लाख
यामध्ये अमरावती विभागाला सर्वाधिक निधी वितरीत करण्यात आला आहे, कारण विदर्भात आत्महत्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसते.
निधी वाटप प्रक्रिया सुलभ करणार
मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले की, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदतीसाठी विलंब होऊ नये म्हणून विभागीय आयुक्तांना निधी वापरण्यासाठी विशेष परवानगीने तातडीने रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होईल आणि वारसांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.
Mumbai,Maharashtra
May 25, 2025 10:49 AM IST
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कोट्यवधींची मदत जाहीर! विभागनिहाय यादी वाचा