वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय?
हिंदू कायद्यानुसार, वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे चार पिढ्यांपर्यंत अविभाजित कुटुंबाकडे असलेली मालमत्ता, जी मुलाला जन्मत:च मिळते. ही मालमत्ता वडिलांकडून, आजोबांकडून किंवा पणजोबांकडून मिळालेली असते. महत्त्वाचे म्हणजे मातृत्वाकडून मिळालेली मालमत्ता वडिलोपार्जित मानली जात नाही, ती वैयक्तिक मालमत्ता म्हणून ओळखली जाते.
मालमत्तेची वैशिष्ट्ये काय?
चार पिढ्यांपर्यंतच्या सदस्यांना समान अधिकार
मालमत्ता अविभाजित असणे आवश्यक
विभाजित झाल्यास प्रत्येकास स्वतंत्र आणि समान वाटा मिळतो
वडिलोपार्जित हक्क हा जन्मतःच मिळतो, तो पूर्वजांच्या मृत्यूमुळे मिळत नाही
एकाच वेळी चार पिढ्या जिवंत असतील, तरी त्यांचा संयुक्त ताबा आणि हक्क असतो
वारसाचे हक्क किती पिढ्यांपर्यंत?
लोकांमध्ये अनेकदा प्रश्न उपस्थित होतो. जसे की, “माझ्या वडिलांच्या आजोबांची मालमत्ता आहे, मला ती मिळू शकते का?” त्याचं उत्तर आहे होय! जर ती मालमत्ता वडिलोपार्जित मानली गेली असेल आणि ती अद्याप विभाजित नसेल, तर चौथ्या पिढीपर्यंत वारसाने हक्क आहे. म्हणजेच, वडील, आजोबा, पणजोबा आणि तुमच्यावर हक्क असू शकतो.
कायदेशीर अडथळे आणि कागदपत्रांचा अभाव
वडिलोपार्जित मालमत्तेचे एक मोठे आव्हान म्हणजे मालकीच्या कागदपत्रांचा अभाव. अनेक दशकांपासून मालमत्ता एकाच कुटुंबाकडे असली, तरी तिने केलेल्या व्यवहारांची नोंद नसल्यामुळे, कायदेशीर मालकी सिद्ध करणे कठीण होते. त्यामुळे वारसांमध्ये वाद निर्माण होतात आणि प्रकरणं न्यायालयात जातात.
समज-गैरसमजामुळे निर्माण होणारे वाद
अनेकदा लोकांना वाटते की वडिलोपार्जित मालमत्तेवर फक्त मुलांनाच अधिकार असतो, पण नवीन कायद्यांनुसार मुलींसुद्धा समान वारस हक्काची पात्र आहेत. काही वेळा, वडिलोपार्जित मालमत्ता चुकीने खाजगी मालमत्तेत गणली जाते आणि त्यावरून कायद्याचे उल्लंघन किंवा फसवणूकही होते.
काय करावे?
मालमत्तेची वैधता, कागदपत्रे आणि स्थिती समजून घ्या
वाद टाळण्यासाठी सर्व वारसांमध्ये स्पष्ट समज आणि व्यवहार लिहून ठेवा
कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेऊन मालमत्तेची नोंदणी आणि विभाजन प्रक्रिया पूर्ण करा
दरम्यान, वडिलोपार्जित मालमत्ता ही हक्काचा विषय असली तरी ती जबाबदारीने हाताळण्याची गरज आहे. नियम स्पष्ट असूनही त्याबाबत अज्ञान असल्याने अनेक वेळा कुटुंबातील संबंध बिघडतात आणि मालमत्ता अडकते. त्यामुळे योग्य माहिती आणि कायदेशीर प्रक्रिया यांचा वापर करूनच असा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत न्यायाने पोहोचवणे आवश्यक आहे.
Mumbai,Maharashtra
May 12, 2025 11:59 AM IST