Last Updated:
IND VS PAK :भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आता थेट देशांतर्गत बाजारावर उमटू लागला असून, विशेषतः सुकामेवा आणि मसाल्यांच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे.
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आता थेट देशांतर्गत बाजारावर उमटू लागला असून, विशेषतः सुकामेवा आणि मसाल्यांच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या पंधरवड्यात काजू, अंजीर, बदाम, मनुका, किसमिस आणि अक्रोड यांसारख्या सुकामेव्याचे दर प्रति किलो 100 ते 400 रुपयांनी वाढले आहेत.
अफगाणिस्तानमार्गे आयातीत अडथळे
भारत सुकामेव्याच्या मोठ्या प्रमाणावर आयातीसाठी अफगाणिस्तानवर अवलंबून आहे. मात्र, भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या युद्धजन्य वातावरणामुळे अफगाणिस्तानहून थेट आयात करणं कठीण झालं आहे. त्यामुळे सध्या दुबईमार्गे वळसा घेऊन आयात करावी लागत असून यामुळे वाहतूक खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे.
सीमावाद, दहशतवाद आणि व्यापारावर परिणाम
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक पावले उचलली असून, पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सीमावर्ती भागातील व्यापारमार्ग बंद झाले असून, आयात-निर्यातीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा येत आहेत.
मसाल्यांचे दरही गगनाला भिडले
फक्त सुकामेवा नव्हे तर शहाजिरे, दालचिनी आणि इतर महत्त्वाच्या मसाल्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. उदाहरणार्थ, शहाजिरेचा दर 750 रुपयांवरून थेट 950 रुपयांवर पोहोचला आहे.
ग्राहक आणि विक्रेत्यांची अडचण
दरवाढीमुळे ग्राहकांची खरेदी क्षमता घटली असून, विक्रेत्यांना देखील मर्यादित साठा असल्याने विक्रीवर परिणाम होत आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “सध्याची युद्धजन्य परिस्थिती अधिक काळ टिकली, तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारत-पाकिस्तानमधील तणावाचा फटका आता सामान्य ग्राहकांच्या खिशाला बसू लागला आहे. सुकामेवा आणि मसाले हे दररोजच्या वापराचे घटक असल्याने, त्यावरील दरवाढ ही घरोघरी आर्थिक ताण निर्माण करू शकते, अशी चिंता व्यापारी आणि ग्राहक व्यक्त करत आहेत.
Mumbai,Maharashtra