Last Updated:
सन 2024 मध्ये कडेगाव तालुक्यातील सुमारे 10 हजार एकर क्षेत्रावर आल्याची लागवड केली आहे. परिणामी आवक वाढली आणि बाजारभाव भूईसपाट झाले.
सांगली : वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती असलेल्या सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणाचा शेती हाच कणा आहे.
चार अवर्षणग्रस्त, तीन पूरग्रस्त आणि तीन डोंगरी अशा दहा तालुक्यांचा समावेश असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव हा मागील वर्षी आल्याचा तालुका म्हणून लक्षवेधी ठरला. गेल्या दोन वर्षांत आले पिकाला उत्तम बाजारभाव मिळाल्याने अनेक आले उत्पादक शेतकरी लखपती, करोडपती बनले. आणि पोषक हवामानावर पैशाचं पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड केली. सन 2024 मध्ये कडेगाव तालुक्यातील सुमारे 10 हजार एकर क्षेत्रावर आल्याची लागवड केली आहे. परिणामी आवक वाढली आणि बाजारभाव भूईसपाट झाले. आले उत्पादकांची स्थिती समजून घेताना लोकल 18 च्या प्रतिनिधींनी कडेगाव तालुक्यातील कृषी समृद्ध असणाऱ्या वांगी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दर्जेदार आले पिकवण्यासाठी एकरी 4 लाखांहून अधिक खर्च केला. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के भाव घसरल्यानं मिळकतीचं गणित कुठेचं जुळत नाही. पिक बाजारात विकायच्या वेळी कायमच भाव पाडले जातात. हे असंच चालू राहिलं तर शेतकऱ्यानं जगायचं कसं? असा सवाल प्रयोगशील शेतकरी दिलीप मोहिते यांनी केला. पुढे त्यांनी एक एकर दर्जेदार आले पिकवण्यासाठी केलेल्या उत्पादन खर्चाचे गणित सांगितले.
एक एकर आल्याचा उत्पादन खर्च:
बियाणे(3टन): 1 लाख 10 हजार
शेणखत(10 ट्रॉली): 60 हजार
खते (रासायनिक आणि सेंद्रिय): 70 हजार
सिंचन व्यवस्था,मजूर व ट्रॅक्टर मेहनत: 1.5 लाख
आले पिकाचे दर कोलमडले आहेत. प्रतिकिलो अवघा 18 रुपये दर मिळत आहे. यामुळे सध्या आले उत्पादकांनी शेतात घातलेला खर्चही निघत नसल्याने कठीण झाले आहे. आल्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळावे, अशी प्रतिक्रिया आले उत्पादक राजेंद्र मोहिते यांनी दिली.
मागील वर्षी 100 ते 110 रुपये प्रति किलो प्रमाणे आले बियानाची खरेदी केली होती. मात्र यावर्षी अठरा ते वीस रुपयांना प्रतिकिलो आले विकावे लागत आहे. अशातच मागील वर्षी सततच्या हवामान बदलाने आले पिकाला कंदकुज रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भयंकर वाढ झाली. शिवाय रोगाच्या प्रादुर्भावाने उत्पादनाची घट झाली.
हमी भाव मिळावा
कंदकुजीचा प्रादुर्भाव झालेले प्लॉट भाव वाढण्याची वाट पाहून खोडव्यासाठी ठेवता येत नाहीत. त्यामुळे व्यापारी बोलतील त्या दरात आले देऊन शेत मोकळे करावे लागत आहे. इतर पिकांप्रमाणे आले पिकास देखील शासनाने हमीभाव निश्चित करून देण्याची गरज आले उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे.
उत्पादन वाढले आणि उत्पन्न गायब झाल्याची स्थिती आले उत्पादकांवर कोसळली आहे. लाखात खर्च करून घाम गाळत कष्टाने पिकवलेल्या आल्यास बाजारभावाचा स्वाद मात्र उरला नाही. दोन कप चहाच्या दरात किलोभर आले विकत शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Sangli,Maharashtra
Agriculture : 2 कप चहाच्या दरात किलोभर आले, भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल, उत्पादन खर्चही निघणे कठीण, Video