Last Updated:
शेतकरी तुकाराम राठोड हे मागील दोन वर्षांपासून आपल्या 20 गुंठे क्षेत्रात भुईमुगाचे यशस्वी पीक घेत होते. मात्र यंदा निसर्गाने पाठ फिरवली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बीड : बीड जिल्ह्यातील मोगरा गावचे शेतकरी तुकाराम राठोड हे मागील दोन वर्षांपासून आपल्या 20 गुंठे क्षेत्रात भुईमुगाचे यशस्वी पीक घेत होते. याआधी त्यांना सातत्याने चांगले उत्पादन मिळत असून दरवर्षी 12 क्विंटलपर्यंत भुईमुगाचे उत्पादन मिळायचे. त्यामुळे त्यांचा आर्थिक गाडा काही प्रमाणात सुरळीत चालत होता. मात्र यंदा निसर्गाने पाठ फिरवली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यावर्षीच्या अचानकपणे आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतात सतत पाणी साचले. त्यामुळे भुईमूग पीक सडू लागले आणि झाडांची वाढ खुंटली. या सततच्या ओलाव्यामुळे भुईमुगाच्या शेंगा पूर्णपणे निपजल्या नाहीत. परिणामी एकीकडे उत्पादनात घट झाली तर दुसरीकडे लागवड, मशागत, फवारणी आदी कामांवर केलेला खर्च वाया गेला.
तुकाराम राठोड यांनी भुईमूग लागवडीसाठी सुमारे 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत खर्च केला होता. त्यामध्ये ट्रॅक्टरने पेरणी, खुरपण, फवारणी, बियाणे व खतांचा समावेश होता. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना त्याच्या मोबदल्यात काहीच मिळाले नाही. पीक वाचवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी फवारण्या केल्या परंतु त्या निष्फळ ठरल्या. जवळपास 1 लाख 20 हजार पर्यंत नुकसान झाल्याची माहिती शेतकरी तुकाराम राठोड यांनी दिली.
यावर्षीच्या नुकसानामुळे तुकाराम राठोड आर्थिक अडचणीत आले आहेत. उत्पन्न शून्यावर आले असल्याने त्यांनी घेतलेले कर्ज फेडणे अवघड झाले आहे. घरखर्च चालवणे देखील कठीण झाले असून पुढील हंगामासाठी भांडवल उभे करणे हा मोठा प्रश्न बनला आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असून पंचनाम्यानंतर योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
हवामानातील बदलाचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून हवामानानुसार पीक व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे अत्यावश्यक आहे जेणेकरून अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये त्यांचे जगणे उद्ध्वस्त होणार नाही.
Bid (Beed),Bid,Maharashtra
Unseasonal Rain: हाता तोंडाशी आलेला घास हिरावला, अवकाळी पावसाने भुईमुगाला फटका, शेतकऱ्याचे 1 लाख नुकसान