काय आहे कायद्यानुसार हक्क?
भारतीय वारसा कायद्यानुसार, जर वडिलांनी आपली मालमत्ता “स्वतः कमावलेली” (self-acquired property) असेल आणि ती त्यांनी जिवंत असतानाच एका मुलाच्या नावावर वसीयत, गिफ्ट डीड किंवा विक्रीच्या माध्यमातून दिली असेल, तर दुसऱ्या मुलाचा त्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर हक्क राहत नाही.
स्वअर्जित मालमत्तेवर वडिलांचा संपूर्ण अधिकार
कोणतीही मालमत्ता जर वडिलांनी त्यांच्या स्वतःच्या कष्टाने कमावलेली असेल, म्हणजेच ती वडिलोपार्जित (ancestral) नसून स्वअर्जित असेल, तर त्या मालमत्तेवर वडिलांना संपूर्ण अधिकार असतो. ते ती मालमत्ता कुणालाही दान, विक्री, गिफ्ट किंवा वसीयत करून देऊ शकतात. त्यांनी जर ती मालमत्ता एका विशिष्ट मुलाच्या नावे केली असेल, तर इतर भावंडांना त्या निर्णयाला आव्हान देण्याचा अधिकार मर्यादित स्वरूपातच असतो.
वडिलोपार्जित मालमत्तेवर सर्वांचा हक्क
दुसरीकडे, जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल, म्हणजेच वडिलांना ती त्यांच्या वडिलांकडून वारशाने मिळाली असेल आणि ती अजूनही विभागली गेलेली नसेल, तर ती मालमत्ता “सह-वारसदारांची” समजली जाते. अशा स्थितीत वडील एकट्याने ती एखाद्या मुलाला देऊ शकत नाहीत. त्या मालमत्तेवर सर्व भावंडांचा समान हक्क असतो. त्यामुळे दुसऱ्या मुलाने त्याचा वाटा मागणे पूर्णपणे कायदेशीर ठरते.
वसीयत (Will) असली तरी काय?
जर वडिलांनी वसीयत केली असेल आणि त्यात संपूर्ण मालमत्ता एका मुलाच्या नावे केली असेल, तर ती वसीयत केवळ वडिलांच्या मृत्यूनंतर लागू होते. वसीयत वैध आहे की नाही हे सिद्ध करणे आवश्यक असते. जर वसीयत नैसर्गिक न्यायाच्या विरोधात असल्याचे आढळले (जसे की, एखाद्या अपंग किंवा दुर्बल मुलाला पूर्णतः डावलणे), तर ती कोर्टात आव्हान दिली जाऊ शकते.
कायदेतज्ज्ञांचे मत
कायदेतज्ज्ञ सांगतात की, “जर वडिलांची मालमत्ता स्वअर्जित आहे आणि त्यांनी कायदेशीर पद्धतीने गिफ्ट डीड किंवा वसीयत करून ती एखाद्या मुलाच्या नावावर केली असेल,तर इतर मुलांना ती रद्द करण्याचा अधिकार नाही. मात्र, जर फसवणूक, जबरदस्ती किंवा मानसिक दबावाचा आरोप असला, तर कोर्टात त्याला आव्हान देता येते.”
(महत्वाची सूचना – सदर बातमी फक्त माहिती करिता आहे. कोणतीही कारवाई करण्याआधी कायदेशीर सल्ला घ्यावा)
Mumbai,Maharashtra
June 03, 2025 3:29 PM IST
वडिलांनी एकाच मुलाला मालमत्ता दिल्यास दुसऱ्याचा हक्क काय? कायदा काय सांगतो?