शेतकऱ्याला मिळणारा दर
याची सुरुवात होते ती शेतकऱ्यापासून. महाराष्ट्रातील अनेक दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना सरासरी प्रति लिटर दूधाचा दर 28 ते 35 रुपये मिळतो. हे दर दूधामधील फॅट आणि एसएनएफ (सॉलिड नॉन फॅट) या घटकांवर ठरवले जातात. मात्र, ही रक्कमही अनेकदा वेळेवर मिळत नाही. म्हणून दूध संकलन करणाऱ्या संस्था,सहकारी दूध संघ किंवा खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करतात.
दर वाढण्याची साखळी कशी आहे?
दूध संकलन व थंड करण्याची प्रक्रिया
शेतकऱ्यांकडून दूध गोळा केल्यावर लगेचच थंड तापमानात साठवले जाते. यासाठी चिलिंग युनिट्स आणि थर्मल वाहतूक व्यवस्था लागते. यावर प्रति लिटर 2-4 रुपये खर्च येतो.
प्रक्रिया व पॅकेजिंग
दूध पाश्चराइज करणे, फिल्टर करणे, फॅट प्रमाण नियंत्रित करणे, विविध प्रकारात वर्गीकरण करणे (टोन, डबल टोन, फुल क्रीम) आणि शेवटी पॅकेजिंग करणे. या सर्व टप्प्यांवर कंपन्या 6-8 रुपये प्रति लिटर खर्च करतात.
वितरण व वाहतूक खर्च
दूध शहरांतील किरकोळ दुकांनांपर्यंत पोहोचवण्यासाठी लॉजिस्टिक्स आवश्यक असते. यामध्ये इंधन, ड्रायव्हर वेतन, वितरण व्यवस्था, आणि कोल्ड स्टोरेजचा समावेश होतो. यात आणखी 5-7 रुपये प्रति लिटर खर्च होतो.
मार्जिन व कर
प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या तसेच किरकोळ विक्रेते (रिटेलर्स) त्यांचं नफा मार्जिन ठेवतात. यामध्ये कंपन्यांचे 8-10 रुपये, तर किरकोळ विक्रेत्यांचे 2-3 रुपये मार्जिन असते. त्याशिवाय जीएसटीसारखे काही अप्रत्यक्ष करही लागू होतात.
ग्राहकाला अंतिम दर
या सर्व टप्प्यांतून जाताना शेतकऱ्यांकडून 30 रुपयांना खरेदी केलेले दूध ग्राहकांपर्यंत 55 ते 65 रुपये प्रति लिटर दराने पोहोचते. म्हणजेच दर सुमारे दुप्पट होतो.
एकूणच काय तर, मध्यस्थ यंत्रणा, प्रक्रिया खर्च, वाहतूक आणि वितरण यंत्रणेचा खर्च. तसेच शेतकऱ्यांच्या मिळकतीवर मर्यादा असताना, वितरण यंत्रणेतील खर्च आणि मार्जिनमुळे ग्राहकाला महाग दूध मिळते.
Mumbai,Maharashtra
June 01, 2025 2:46 PM IST
शेतकऱ्यांपासून ते ग्राहकापर्यंत! दुधाचा दर दुप्पट कसा होतो? वाचा त्यामागचे अर्थगणित