Last Updated:
Mango Rate: मुंबईत आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून हापूस आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
नमिता सूर्यवंशी, प्रतिनिधी
मुंबई: गुढीपाडव्यापासून आंब्याचा हंगाम जोमात सुरू झाला आहे. मुंबईत याच दिवशी पहिल्यांदाच बाजारात एक लाख पेट्यांचा टप्पा पार झाला. यामध्ये कोकणातून 79,746 पेट्या, तर इतर राज्यांतून 33,160 पेट्यांची आवक झाली आहे. गेल्या आठवड्यात आंब्याचे दर 300 ते 1200 रुपये डझन होते, पण आता हे दर कमी होऊन 200 ते 800 रुपये डझन झाले आहेत. हे दर आणखी खाली येण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. सोमवारी तब्बल 1 लाख 13 हजार पेट्यांमधून सुमारे 253 टन आंबा बाजारात आला. यामुळे आंब्याचे दर कमी झाले असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी आलेला आंबा या आठवड्याच्या अखेरीस पूर्णपणे पिकून ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे पुढच्या आठवड्यात अजून स्वस्त दरात आंबा मिळू शकतो. एकंदरीत, आंब्याची आवक वाढल्यामुळे त्याचे दर कमी झाले असून, सर्वसामान्य ग्राहक आता अधिक परवडणाऱ्या किमतीत हापूस आंब्याचा आस्वाद घेऊ शकतील.
यंदा हवामान अनुकूल राहिल्यामुळे कोकणात आंब्याचे उत्पादन चांगले झाले आहे. परिणामी बाजारात मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू झाला आहे. मात्र या हंगामात ग्राहकांनी कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा ओळखण्याची आणि टाळण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. कार्बाईड किंवा इतर रसायनांद्वारे पिकवलेले आंबे आरोग्यास घातक ठरू शकतात. त्यामुळे अधिकृत विक्रेत्याकडून किंवा विश्वासार्ह ठिकाणांहूनच आंबा खरेदी करावा. एकूणच, यंदाचा हंगाम चांगला असून, हापूसच्या चाहत्यांसाठी ही खूपच आनंदाची बाब आहे.
Mumbai,Maharashtra
April 11, 2025 9:48 PM IST
Mango Rate: हापूस आंब्याच्या दरात मोठी घसरण, मुंबईत डझनबर आंबे मिळणार फक्त इतक्या रुपयांत