डाळिंब लागवडीचे नियोजन
डाळिंब लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी काळी जमीन, चांगली निचरा व्यवस्था असलेली आणि थोडीशी चुनखडी असलेली जमीन योग्य ठरते. एक एकर क्षेत्रात 250 ते 300 झाडे सहज लावता येतात. भगवा, गणेश, अर्का रक्षक हे उंच दर्जाचे, निर्यातक्षम आणि अधिक उत्पन्न देणारे वाण निवडल्यास उत्पादनात मोठी वाढ होते.
लागवडीसाठी आवश्यक खर्च
डाळिंब लागवडीसाठी सुरुवातीच्या वर्षी अधिक खर्च येतो. जमीन तयार करणे, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन, झाडांची खरेदी, संरक्षित तंत्रज्ञान यासाठी अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपये खर्च होतो. त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून उत्पादन सुरू होते.
रोपांची किंमत : 60 ते 100 प्रतिरोप
ठिबक सिंचन : 35,000 ते 50,000 रु
औषध/खते : वार्षिक 20,000 ते 30,000 रु
मजुरी, देखभाल : 20,000 रु
उत्पादन आणि विक्री
डाळिंब झाडाला लागवडीनंतर 16 ते 18 महिन्यांत फळे येऊ लागतात. एक झाड सरासरी 10 ते 15 किलो फळ देते. म्हणजेच एक एकरमधून सरासरी 3,000 ते 4,000 किलो डाळिंब मिळते.
डाळिंबाचे बाजारमूल्य हंगामानुसार 50 ते 150 प्रति किलो दरम्यान असते. सरासरी 80 दर गृहीत धरल्यास, एक एकरात 2.5 ते 3.5 लाखांचे उत्पादन शक्य होते. निर्यातक्षम दर्जाचे फळ तयार केल्यास ही किंमत अधिक असते. काही शेतकरी प्रती एकर 7-10 लाखांचे उत्पन्न कमावतात.
शासकीय योजनांचा लाभ
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत डाळिंब लागवडीसाठी 75% ते 100% पर्यंत अनुदान मिळू शकते. ठिबक सिंचनासाठीही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत अनुदान उपलब्ध आहे.
Mumbai,Maharashtra
May 27, 2025 11:58 AM IST