ही शेती केवळ शेतकऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर अनेक आयटी इंजिनिअर्स, गृहिणी, तसेच तरुण उद्योजक सुद्धा हायड्रोपोनिक्स, अॅक्वापोनिक्स आणि व्हर्टिकल फार्मिंगच्या साहाय्याने शेती करत आहेत. ही शेती कोणत्याही मातीशिवाय, अगदी घराच्या गच्चीवर किंवा एखाद्या छोट्या खोलीतही करता येते.
हायड्रोपोनिक्स म्हणजे काय?
हायड्रोपोनिक्स ही मातीविना शेती करण्याची वैज्ञानिक पद्धत आहे. यामध्ये झाडे थेट पाण्यात किंवा मातीऐवजी कोकोपीट (नारळाच्या शेंड्यापासून बनवलेले माध्यम), परलाइट, किंवा वर्मिक्युलाइट अशा विशेष माध्यमांमध्ये लावली जातात. झाडांना लागणारी अन्नद्रव्ये म्हणजेच पोषणतत्त्वे पाण्यात मिसळून झाडांना दिली जातात. हे पाणी नियंत्रित प्रमाणात झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवले जाते.
या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे झाडांच्या मुळांपर्यंत थेट पोषण मिळत असल्यामुळे त्यांची वाढ जलद होते आणि उत्पन्नही अधिक मिळते.
मातीविना शेतीचे फायदे
पाणी बचत – पारंपरिक शेतीत प्रचंड पाणी लागते.मात्र हायड्रोपोनिक्समध्ये त्याच्या फक्त 10-15 टक्के पाण्याचा वापर होतो.
कमी जागेत जास्त उत्पादन – शहरांमध्ये जागेची कमतरता असते. परंतु हायड्रोपोनिक शेती उभी (व्हर्टिकल) रचनेत करता येते. यामुळे लहानशा फ्लॅटच्या गच्चीतही शेती शक्य होते.
रासायनिक खतांचा वापर कमी – ही संपूर्ण शेती नियंत्रित वातावरणात (Controlled Environment) केली जाते. त्यामुळे रासायनिक कीटकनाशकांची गरज कमी भासते.
स्वच्छ, सुरक्षित व उच्च प्रतीचे उत्पादन – बाजारात मिळणाऱ्या भाज्यांपेक्षा अधिक ताज्या व विषमुक्त भाज्या हायड्रोपोनिक्समधून मिळतात.
संपूर्ण वर्षभर शेती शक्य – पावसाळा, हिवाळा, उन्हाळा याचा परिणाम फारसा होत नाही, कारण शेती बंद वातावरणात होते.
नफा अधिक – थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे मध्यस्थ कमी होतात आणि नफा अधिक मिळतो.
कोणकोणते पीक घेता येतात?
हायड्रोपोनिक्समध्ये खालील प्रकारची पिके घेता येतात जसे की,
पालेभाज्या – पालक, मेथी, कोथिंबीर, लेट्यूस, बासिल, ऑरिगेनो
फळभाज्या – टोमॅटो, मिरची, काकडी, वांगी
फळे – स्ट्रॉबेरी
औषधी वनस्पती – तुळस, पुदिना
आर्थिक गुंतवणूक आणि परतावा
हायड्रोपोनिक शेतीसाठी सुरुवातीस सुमारे 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. यामध्ये नर्सरी ट्रे, नयलॉन पाइप्स, न्युट्रिशन सोल्युशन,पंप, टायमर्स, लाइट्स इत्यादींचा समावेश होतो.
शिवाय, सरकारकडूनही यासाठी अनुदान उपलब्ध आहे. कृषी विभाग, राष्ट्रीय बागायत मिशन (NHM), आणि काही खासगी बँका देखील अशा प्रकल्पांना आर्थिक मदत करतात. प्रशिक्षणासाठी कृषी विद्यापीठे व खाजगी संस्था कार्यशाळा घेतात.
एकदा यंत्रणा कार्यान्वित झाली की महिन्याला 30,000 ते 2 लाखांपर्यंत उत्पन्न शक्य आहे.ते पिकाच्या प्रकारावर, विक्रीच्या पद्धतीवर आणि मार्केटिंगवर अवलंबून आहे.
Mumbai,Maharashtra