Last Updated:
खरीप हंगामाच्या सुरुवातीला आपल्या शेतातील मातीचे आरोग्य तपासल्यास भविष्यात भरघोस उत्पन्न मिळवणं शक्य होतं. त्याचबरोबर मातीमध्ये असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य याची माहिती होते.
जालना : खरीप हंगामाला थोड्याच दिवसांमध्ये सुरुवात होत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला आपल्या शेतातील मातीचे आरोग्य तपासल्यास भविष्यात भरघोस उत्पन्न मिळवणं शक्य होतं. त्याचबरोबर मातीमध्ये असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य याची माहिती होते. त्यामुळे माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. माती परीक्षण का आणि कसे करावे? याबद्दलचं आपल्याला जालना येथील कृषी विज्ञान केंद्रातील मृदा शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी माहिती दिली आहे.
माती परीक्षण करत असताना एक एकर क्षेत्रावरील मातीचे नमुने घ्यावेत. मातीचे नमुने घेताना शेणखत असलेली जागा, जनावरे बांधत असलेली जागा, झाडाखालील जागा, जिथे पाणी साचून राहते ती जागा किंवा पाण्याचा पाठ असलेली जागा अशा ठिकाणची माती नमुन्यासाठी घेऊ नये. या जागा व्यतिरिक्त एक एकर क्षेत्रावरील सात ते आठ ठिकाणाहून नमुने घ्यावेत.
मातीची नमुने घेताना व्ही आकाराचा 45 सेमी खोल खड्डा करावा. खड्ड्याच्या दोन बाजूला असलेली माती खुरप्याने खरडून घ्यावी. त्याच पद्धतीने सात ते आठ ठिकाणी नमुने घ्यावेत. जमा झालेली माती एका गोणपाटावर टाकावी. या मातीचे चार भाग करावेत. समोरासमोरील भाग काढून टाकावे. पुन्हा एकदा माती मिसळून घ्यावी. पुन्हा एकदा चार भाग करून समोरासमोरील भाग काढून टाकावे. राहिलेल्या दोन भागातील माती जमा करून कापडी पिशवीमध्ये भरून घ्यावी. अशा पद्धतीने आपण आपल्या शेतातील मातीचा नमुना तयार करू शकतो.
नमुना तयार झाल्यानंतर यामध्ये शेतकऱ्याचे नाव, शेतीचा गट क्रमांक, नमुना घेण्याआधी घेतलेले पीक व नमुना घेतल्यानंतर घ्यावयाचे पीक याबाबतची माहिती एका चिठ्ठीवर लिहून ही चिठ्ठी या नमुन्यात टाकावी. अशा पद्धतीने आपण मातीचा नमुना जमा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवू शकतो.
माती परीक्षण केल्याने आपल्याला जमिनीचे आरोग्य समजते. मातीमध्ये कोणकोणते अन्नद्रव्य आहेत व कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे त्याची माहिती मिळते. या आधारे आपण आपल्या जमिनीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके घेऊ शकतो. त्याचबरोबर घेतलेल्या पिकांना खतांची मात्रा कशा पद्धतीने द्यावी याबाबत शेतकऱ्यांना कल्पना येते. त्यामुळे जमिनीचे माती परीक्षण आवश्यक करावे, असे आवाहन मृदा शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी केलंय.
Jalna,Maharashtra
Soil Testing : खरीप हंगामातील पिकांसाठी फायदा, माती परीक्षण कसं कराल? संपूर्ण माहितीचा Video