Last Updated:
Agriculture News : भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम देशातील शेतमालाच्या निर्यात-आयातीवर होत आहे. याचा फटका थेट नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर परिसरात होणाऱ्या केळीच्या निर्यातीला बसला आहे.
नांदेड : भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम देशातील शेतमालाच्या निर्यात-आयातीवर होत आहे. याचा फटका थेट नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर परिसरात होणाऱ्या केळीच्या निर्यातीला बसला आहे. अर्धापूर परिसरात उत्पादन होणारी केळी दुबईमार्गे इराक, इराण, ओमान अशा पश्चिम आशियाई देशांत पाठवली जाते. मात्र सध्या युद्धजन्य स्थितीमुळे ही निर्यात पूर्णतः ठप्प झाली आहे.
निर्यात बंद, दरात घसरण
यंदा मालेगाव, दाभड आणि अर्धापूर या तीन प्रमुख मंडळांमध्ये केळीची वाढीव लागवड झाली आहे. या भागातील केळी आकाराने मोठी, लांब व चवीलाही गोड असल्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी असते. परंतु सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे मागील काही दिवसांपासून निर्यात पूर्ण थांबली असून, याचा थेट परिणाम स्थानिक बाजारातील दरावर झाला आहे.
केळीच्या काढणीला एक महिना पूर्ण होत आला असून, सुरुवातीला मिळणारा दर 1600 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल होता. निर्यात सुरू राहिली असती, तर दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत केवळ 1200 ते 1300 रुपये प्रतिक्विंटल इतकाच दर मिळत आहे, जो उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी आहे.
विदेशात दर अधिक, पण निर्यात ठप्प
गेल्या वर्षी या परिसरातून लाखो टन केळी दुबईमार्गे इराक, इराण आणि इतर देशांत निर्यात झाली होती. त्या वेळी केळीला 2400 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला होता. स्थानिक व्यापाऱ्यांच्या पुढाकारामुळे विदेशात अर्धापूरच्या केळीची खास ओळख निर्माण झाली होती.
सध्या देशांतर्गतच मागणी
विदेशात निर्यात बंद असल्यामुळे सध्या अर्धापूर येथून दिल्ली, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि श्रीनगर या भागात केळी पाठवली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही काही प्रमाणात माल पाठवला जात आहे. मात्र, या बाजारात दर तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे.
शेतकऱ्यांना अपेक्षा
स्थानिक शेतकरी सध्या मोठ्या चिंतेत आहेत. तयार झालेला माल साठवणुकीस योग्य नाही आणि निर्यात बंद असल्याने भाव घसरले आहेत. शेतकऱ्यांना आशा आहे की, येत्या काही आठवड्यांत आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये स्थैर्य येईल, आणि केळीची निर्यात पुन्हा पूर्वपदावर येईल. त्यामुळे उत्पादनाला योग्य दर मिळेल आणि आर्थिक नुकसान थांबेल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Mumbai,Maharashtra
भारत -पाक तणावाचा केळी निर्यातीला फटका! शेतकऱ्यांचे झालं करोडोंचे नुकसान