कोथिंबीर लागवडीसाठी सर्वोत्तम वेळ आणि तयारी
जून ते ऑगस्ट हा काळ कोथिंबीर लागवडीसाठी सर्वोत्तम मानला जातो. या पिकासाठी मध्यम ते हलकी, चांगल्या निचऱ्याची जमीन उपयुक्त असते. पावसाळ्यात विशेषतः अतिरिक्त पाणी साचल्यास मुळे कुजतात, त्यामुळे बेड तयार करताना पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल याकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे.
दोन वेळा नांगरणी करून भुसभुशीत जमीन तयार करावी. शेणखत, कंपोस्ट, आणि निंबोळी खत यांचा योग्य प्रमाणात वापर बेड तयार करून 1 ते 1.5 किलो बियाणं प्रति गुंठा टाकावं
काढणी आणि विक्री
कोथिंबीरचं पीक 45 ते 50 दिवसांत काढणीस तयार होतं. दरम्यान नियमित निंदणी, कीडनाशक फवारणी,आणि पाणी व्यवस्थापन आवश्यक आहे. पावसाळ्यात सिंचन कमी लागलं तरी पाण्याचा अतिरेक टाळणं फार महत्त्वाचं ठरतं.
पीक तयार झाल्यावर ते थेट शेतकरी बाजार, घाऊक बाजारपेठ किंवा स्थानिक किरकोळ विक्रेत्यांना विकता येतं. यावेळी दर 30 रुपये ते 100 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात. विशेषतः पुरवठा कमी आणि मागणी अधिक असल्यामुळे पावसाळा हा विक्रीसाठी सर्वात फायदेशीर काळ ठरतो.
कोथिंबीर लागवडीचं आर्थिक गणित
एका एकरात साधारणतः 80 ते 100 गुंठ्यांमध्ये लागवड करता येते. एका गुंठ्यातून सरासरी 25 ते 30 किलो कोथिंबीरचं उत्पादन मिळतं. म्हणजेच एकूण एकरातून 2500 ते 3000 किलो उत्पादन शक्य आहे.
जर सरासरी दर 40 रु. प्रति किलो धरला, तर एकरमागे मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज 1 लाख ते 1.2 लाख रुपये इतका होतो. दर वाढल्यास हेच उत्पन्न सहजपणे 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतं.
कमी खर्चात अधिक नफा
कोथिंबीरच्या शेतीत सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इनपुट खर्च कमी असणं. बियाणं, सेंद्रिय खतं, मजुरी, वाहतूक व औषधं धरून एकरमागे 20,000 ते 25,000 रुपये खर्च येतो. याचा अर्थ फक्त 50 दिवसांच्या शेतीत शेतकरी 75,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत नफा कमवू शकतो.
Mumbai,Maharashtra
June 03, 2025 11:43 AM IST