मुलींचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क कायद्याने मान्य
भारतातील विविध कायदे, विशेषतः हिंदू उत्तराधिकारी अधिनियम, 1956 (Hindu Succession Act) नुसार, वडिलांच्या वडिलोपार्जित तसेच स्वतः कमावलेल्या संपत्तीमध्ये मुलाला आणि मुलीला समान हक्क आहे. 2005 मध्ये झालेल्या सुधारणांनंतर मुलींना वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण कायदेशीर अधिकार मिळाला आहे, तोही मुलांच्या समान.
कोणत्या संपत्तीवर हक्क असतो?
वडिलोपार्जित संपत्ती – डिलांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेली मालमत्ता.
स्वतः कमावलेली संपत्ती – वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने मिळवलेली मालमत्ता.
जर वडिलांनी मृत्युपत्र (Will) तयार केले नसेल, तर दोन्ही प्रकारच्या संपत्तीत मुलींना समभाग मिळतो.
मृत्युपत्र असेल तर काय?
जर वडिलांनी स्वतःची कमावलेली संपत्ती मृत्युपत्राद्वारे एका मुलालाच दिली असेल, तर त्या संपत्तीवर मुलीचा अधिकार राहत नाही. मात्र, वडिलोपार्जित संपत्तीचे वाटप वडील इच्छेने केवळ एका मुलाला देऊ शकत नाहीत. अशा संपत्तीमध्ये सर्व मुलांना आणि मुलींना कायदेशीर वाटा असतो.
कोणत्या परिस्थितीत हक्क जातो?
जर मुलीने कोर्टात लेखी स्वरूपात तिच्या हक्काचा त्याग केला असेल. तिने पैशाची भरपाई घेतली असेल. जाणीवपूर्वक कोणताही दावा केला नसेल आणि खूप वर्षे लोटली असतील (हक्क सिद्घ होऊ शकत नाही). मात्र, लग्न झाल्यामुळे मुलीचा हक्क संपतो हा समज पूर्णतः चुकीचा आहे. लग्न झालेल्या मुलीलाही वडिलांच्या संपत्तीवर तितकाच हक्क आहे जितका मुलाला आहे.
धर्मानुसार कायद्यांमध्ये फरक
हिंदू, बौद्ध, जैन, शीख धर्मीयांसाठी – हिंदू उत्तराधिकारी अधिनियम लागू होतो.
मुस्लिम नागरिकांसाठी – पर्सनल लॉ (Muslim Personal Law) लागू होतो, ज्यामध्ये मुलीला ठराविक वाटा मिळतो.
ख्रिश्चन आणि पारशी धर्मीयांसाठी – भारतीय उत्तराधिकारी अधिनियम, 1925 लागू होतो.
Mumbai,Maharashtra
June 05, 2025 2:43 PM IST