Last Updated:
Agriculture News : पारंपरिक शेतीतील सोयाबीन आणि कापसासारख्या पिकांचा दबदबा असतानाही, सध्या मक्याच्य शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वेगाने वाढत आहे. शेतीतून अधिक उत्पादन, विविध उपयोग आणि स्थिर बाजारभाव यामुळे मका हे अनेक बाबतीत इतर पिकांपेक्षा पुढे गेले आहे.
मुंबई : पारंपरिक शेतीतील सोयाबीन आणि कापसासारख्या पिकांचा दबदबा असतानाही, सध्या मक्याच्य शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वेगाने वाढत आहे. शेतीतून अधिक उत्पादन, विविध उपयोग आणि स्थिर बाजारभाव यामुळे मका हे अनेक बाबतीत इतर पिकांपेक्षा पुढे गेले आहे.
कृषी क्षेत्रात कोणत्याही पिकाचे महत्त्व त्याच्या अन्न, चारा, फायबर आणि इंधन या चार घटकांवरून ठरवले जाते. या निकषांवर मका सध्या अग्रेसर आहे. मानव आणि जनावरांच्या आहारात मका महत्त्वाची भूमिका बजावतो. मक्याचे कणीस आणि दाणे मानवी आहारात वापरले जातात, तर मक्याची चारा म्हणून मोठ्या प्रमाणावर गरज असते.
इथेनॉलसाठी महत्त्वाचे पीक
सध्या देशभरात इथेनॉल उत्पादन आणि वापराबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. मक्याचा इथेनॉल उत्पादनासाठी वाढता वापर हे त्याचे एक प्रमुख आकर्षण बनले आहे. मका कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असल्यामुळे त्यापासून इथेनॉल तयार करणे अधिक सोपे आणि परिणामकारक ठरते.
उदाहरणार्थ, 2022-23 मध्ये साखर कारखान्यांनी उसापासून 31 कोटी लिटर इथेनॉल तयार केले, तर 2023-24 मध्ये मक्यापासून तब्बल 286 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्यात आले. हा आकडा स्पष्ट दर्शवतो की, मका हे आता इंधन निर्मितीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पीक बनले आहे.
दरवाढीमुळे आर्थिक लाभ
मक्याच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या किमतींतही स्थिर वाढ होत आहे. 2021-22 मध्ये मका हमीभाव 1870 रुपये होता, तो 2024-25 मध्ये 2225 रुपयांवर पोहोचला आहे. सध्या बाजारात मक्याचे दर 1800 ते 2700 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. इथेनॉल उद्योगातील उपयोगामुळे मक्याच्या बाजारमूल्याला चालना मिळत असून शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळत आहे.
ढेपेच्या बाजारातही मका आघाडीवर
अगोदर जनावरांच्या चाऱ्यासाठी सोयाबीन व कापसाच्या ढेपेचा अधिक उपयोग केला जात असे. मात्र आता मक्यापासून तयार होणाऱ्या ढेपेला अधिक मागणी मिळत आहे. मका प्रथिनांनी तितका समृद्ध नसला तरी, त्याच्या ढेपेची किंमत तुलनेत कमी आणि पोषणमूल्य समाधानकारक असल्यामुळे कमी खर्चात अधिक फायदा मिळतो. त्यामुळे मका आता पेंड/ढेप उद्योगातही आपले स्थान निर्माण करत आहे.
Mumbai,Maharashtra
सोयाबीन, कापसाऐवजी मक्याला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती का मिळतेय? वाचा त्यामागचं कारण