Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच ढगांची हालचाल आणि हलक्या सरींचा प्रारंभ झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच ढगांची हालचाल आणि हलक्या सरींचा प्रारंभ झाल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा आहे. तो म्हणजे मान्सून लवकर आला तर पेरणी लगेच करावी की थोडी वाट पाहावी? या संदर्भात कृषी तज्ज्ञ आणि विभागाने महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे.
लवकर पाऊस म्हणजे खात्रीशीर पावसाळा नव्हे
मान्सूनचे आगमन लवकर झाले तरी त्याचा अर्थ असा नाही की पावसाचा जोर सातत्याने सुरूच राहील. सुरुवातीला काही दिवस पावसाची उघडीप मिळाल्यास बियाण्यांची उगम प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.त्यामुळे पेरणी करताना केवळ पहिल्या सरींवर विसंबून न राहता, पावसाचे स्थिर व पर्याप्त प्रमाणात आगमन झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
कृषी तज्ज्ञांचा सल्ला
कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला देत आहेत की, खरीप हंगामाची पेरणी करण्यापूर्वी कमीत कमी 75-100 मिमी सततचा पाऊस आणि 2-3 दिवस जमिनीत ओल टिकेल इतका आद्रता स्तर असणे आवश्यक आहे. लवकर पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका संभवतो. तसेच, नंतर जर उघडीप आली तर उगवलेली रोपे वाळून जाण्याची शक्यता असते.
जमिनीची तयार स्थिती आणि बियाण्यांची निवड
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी आपली जमिनीची मशागत पूर्ण करून ठेवावी. पाऊस स्थिर झाल्यानंतर लगेच पेरणी करता येईल यासाठी बियाणे, खते, औषधे यांची साठवणूक वेळेत करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच, लवकर पेरणीसाठी निवडायची असलेली बियाण्याची जात देखील बदलावी लागते. काही विशिष्ट पीकजाती लवकर पेरणीस योग्य असतात. उदा.लवकर तयार होणाऱ्या सोयाबीन, मूग, उडीद, नाचणी, ज्वारीच्या जाती.
दरम्यान, मान्सूनचे लवकर आगमन निश्चितच एक आशादायक संकेत असला, तरी घाईने पेरणी न करता, परिस्थितीचे सखोल आकलन करूनच निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. अन्यथा पिकाचे नुकसान, आर्थिक तोटा आणि बियाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra
May 17, 2025 10:53 AM IST
मान्सून लवकर येतोय पण पेरणीचं काय? करावी कि नाही? वाचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला