Last Updated:
Weather Update : यंदाचा मॉन्सून अपेक्षित वेळेच्या एक दिवस आधी, तसेच सरासरी वेळेच्या तब्बल आठ दिवस आधीच भारतात दाखल झाला आहे.
मुंबई : यंदाचा मॉन्सून अपेक्षित वेळेच्या एक दिवस आधी, तसेच सरासरी वेळेच्या तब्बल आठ दिवस आधीच भारतात दाखल झाला आहे. आज, 24 मे रोजी, मॉन्सूनने केरळमध्ये प्रवेश केला असून त्याने तमिळनाडूचा बहुतांश भाग आणि कर्नाटकाच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सून सध्या गोव्याच्या सीमेलाच पोहोचला असून पुढील 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्रातही तो दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार आगेकूच
मॉन्सूनने दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा जोरदार झेप घेतली आहे. संपूर्ण केरळ राज्य, तमिळनाडूचा बहुतांश भाग, कर्नाटकाचा काही भाग, तसेच दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग आणि मिझोरामचा काही भाग याठिकाणीही मॉन्सूनने पाय ठेवले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनची सध्याची हद्द
आज मॉन्सूनची हद्द कर्नाटकातील करवार व सिमोगा, तमिळनाडूतील धर्मापुरी व चेन्नई, तसेच मिझोराममधील सैहा या भागांपर्यंत पोहोचली आहे. सध्या वातावरण मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत पोषक असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात लवकरच आगमन
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 2 ते 3 दिवसांत मॉन्सून संपूर्ण गोवा व्यापून महाराष्ट्रात प्रवेश करेल. त्याचबरोबर तो आंध्र प्रदेशात, उर्वरित तमिळनाडूमध्ये, कर्नाटकातील शिल्लक भागात, ईशान्य भारतातील काही राज्यांत, पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागात आणि सिक्कीममध्येही दाखल होणार आहे.
बंगाल व अरबी समुद्रातील हालचालही वेगात
मॉन्सून याच कालावधीत मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत देखील प्रवेश करेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात मॉन्सूनच्या वेगवान आगमनाने शेतकरी आणि नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
मॉन्सूनच्या वेळेपूर्वी आगमनामुळे महाराष्ट्रात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला गती मिळेल, असेही तज्ज्ञांचे मत आहे. हवामान विभागाकडून येणाऱ्या पुढील अपडेट्सकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai,Maharashtra