काय आहे बदल?
नोंदणी अधिनियमातील कलम 21 आणि 22 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापैकी कलम 21 मध्ये, दस्त नोंदणी करताना स्थावर संपत्तीचे वर्णन इतके स्पष्ट असावे की त्या मिळकतीची ओळख अचूकपणे पटावी. या उद्देशाने आता दस्तामध्ये चतुःसीमा (सीमाभाग) स्पष्टपणे नमूद करण्यासोबत त्या मिळकतीच्या विशिष्ट खूणीचा उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शहरी आणि ग्रामीण भागासाठी काय नियम?
ग्रामीण भागातील मिळकतीसाठी : गाव, तालुका, गट / सर्व्हे क्रमांक आणि चतुःसीमा नमूद करणे आवश्यक राहील.
शहरी भागातील सदनिकांसाठी : प्रकल्पाचे नाव, गाव, तालुका, गट / सर्व्हे क्रमांक, इमारतीचा क्रमांक, नाव, तसेच सदनिकेचा मजला आणि सदनिकेचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक असेल.
नकाशा जोडण्याबाबत महत्त्वाची सवलत
खरेदी-विक्री होणाऱ्या शेतजमिनीचे क्षेत्र जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी नसेल, तर त्या दस्तासाठी मोजणीचा नकाशा जोडण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असून, शेतकऱ्यांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
कागदपत्रांच्या बाबतीत कोणते बदल?
या नव्या नियमांमुळे सध्या लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये कोणतीही भर पडलेली नाही. पूर्वीप्रमाणेच आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. मात्र, दस्तासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत.
नियम ठरवण्याचा अधिकार आता राज्य सरकारकडे
या दुरुस्तीमुळे नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार आहे. मिळकतीच्या प्रकारानुसार कोणती कागदपत्रे आवश्यक ठरतील, हे ठरवण्याचा हक्क राज्य सरकारकडे दिला गेला आहे. त्यामुळे भविष्यातील दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक सुसंगत आणि मार्गदर्शित होण्याची शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra
May 14, 2025 12:14 PM IST
दस्त नोंदणीसंदर्भात नवीन नियम लागू! राष्ट्रपतींनी दिली मंजूरी, ही गोष्ट असणार बंधनकारक