Last Updated:
Agriculture News : : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस अत्यंत निराशाजनक ठरले आहेत. कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन तो क्विंटलमागे केवळ 800 ते 1,000 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
नाशिक: जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवस अत्यंत निराशाजनक ठरले आहेत. कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होऊन तो क्विंटलमागे केवळ 800 ते 1,000 रुपयांपर्यंत खाली आला आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा भरून निघत नाही.
कांदा बाजारपेठेचा कणा मानल्या जाणाऱ्या लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला आणि उगाव बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत असून, त्यामुळे दरावर दबाव निर्माण झाला आहे.
भारत-पाक तणावाचा परिणाम
भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावामुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका यासारख्या शेजारी देशांत होणारी नियमित निर्यात थांबल्यामुळे भारतातील बाजारपेठांमध्ये कांद्याचा साठा वाढत चालला आहे.
नाफेड आणि एनसीसीएफ खरेदीपासून दूर
सहसा कांद्याच्या दरात घसरण झाल्यास केंद्र सरकारच्या नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या संस्था बाजारात हस्तक्षेप करतात आणि थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करतात. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे कांदा खरेदीस सुरुवात न केल्याने व्यापाऱ्यांच्या खरेदीवरही परिणाम झाला आहे. शासकीय हस्तक्षेपाच्या अभावामुळे बाजारातील स्थिती आणखी गंभीर झाली आहे.
शेतकऱ्यांचे वाढते संकट
यंदा हवामान अनुकूल होते, त्यामुळे कांद्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक झाले. परंतु, उत्पादन चांगले झाले असले तरी बाजारात दरच मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरलेले नाही. अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात जातच नाहीत, कारण वाहतूक व बाजार शुल्क भरूनही काहीच मिळत नाही, असाही त्यांचा अनुभव आहे.
Mumbai,Maharashtra
IND VS PAK : भारत-पाक तणावाचा कांद्याला फटका! दरात मोठी घसरण, सध्याचा बाजारभाव काय?