आतापर्यंत केंद्र सरकारने 19 हप्त्यांचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण केले असून, आता शेतकरी 20 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, यंदाचा हप्ता मिळवण्यासाठी काही अत्यावश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. अन्यथा तुमचा पुढचा हप्ता रोखला जाऊ शकतो.
20 वा हप्ता कधी मिळणार?
सद्यःस्थितीत केंद्र सरकारकडून 20 व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तथापि, खात्रीलायक सूत्रांनुसार, जुलै 2025 च्या आत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
पण याआधी काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि तपशील अद्ययावत (Update) करणं अत्यावश्यक आहे. हे काम न केल्यास, लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार नाही.
या तीन कामांची पूर्तता करणे गरजेचे
1) ई-केवायसी पूर्ण करा
पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचा हप्ता थांबू शकतो. ई-केवायसी तुम्ही pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर OTP किंवा बायोमेट्रिक पद्धतीने करू शकता.
2) बँक खाते अद्ययावत ठेवा
तुमचं बँक खाते सक्रिय आणि आधार कार्डशी संलग्न असणं गरजेचं आहे. जर बँक खाते बंद, चुकीचे किंवा निष्क्रिय असेल, तर हप्ता ट्रान्सफर होणार नाही.
3) जमिनीच्या नोंदी तपासा
पीएम किसानचा लाभ फक्त भूमीधारक शेतकऱ्यांनाच मिळतो. त्यामुळे जमिनीच्या नोंदी (Land Records) मध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. भागधारक किंवा भूमिहीन असाल तर तुम्ही पात्र ठरणार नाही.
या पडताळण्या का आवश्यक आहेत?
ई-केवायसी सरकारला हे समजण्यास मदत करते की लाभ घेणारे व्यक्ती खरे शेतकरी आहेत की नाही.
बँक खात्याची पडताळणी केल्याने आर्थिक मदत योग्य खात्यातच जमा होते. जमिनीच्या नोंदी तपासणी शेतकऱ्याच्या मालकी हक्काची खातरजमा करते, जेणेकरून फसवणूक किंवा गैरवापर होणार नाही.
शेतकऱ्यांनी काय करावे?
ज्यांनी अद्याप ई-केवायसी किंवा बँक खाते अपडेट केलं नसेल, किंवा जमिनीच्या नोंदींत नाव तपासलं नसेल, त्यांनी त्वरित संबंधित प्रक्रिया पूर्ण करावी. कारण, या गोष्टी वेळेत पूर्ण न झाल्यास, तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं.
Mumbai,Maharashtra