Last Updated:
Agriculture News : महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्यातील अनेक भागांत पावसाचा तडाखा बसला आहे. कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने विविध स्वरूपात हजेरी लावली.
मुंबई : महाराष्ट्रात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्यातील अनेक भागांत पावसाचा तडाखा बसला आहे. कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने विविध स्वरूपात हजेरी लावली. काही भागांत ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
पुण्यात मुसळधार, चिंचवडमध्ये विक्रमी नोंद
मंगळवारी (20 मे) रात्री आठनंतर राज्यात ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये हैदोस घातला. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. चिंचवड येथे बुधवारी (21 मे) सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल 101 मिमी पावसाची नोंद झाली. अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात पडलेल्या पावसामुळे मध्यवर्ती पुणे आणि उपनगरांतील रस्त्यांवर पाणी साचले, वाहतूक ठप्प झाली.
कोकणात कहर, सिंधुदुर्गात जनजीवन विस्कळीत
कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सिंधुदुर्गमध्ये अनेक शहरांत पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. वीज पुरवठा खंडित झाला असून, वीज पडून कुडाळ येथील एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला आहे. वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी आणि कुडाळ या तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
मॉन्सूनपूर्व पावसामुळे खरिपाच्या तयारीला चालना मिळाली असली, तरी उन्हाळी पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. राज्यातील अनेक भागांत बाजरी, मका, भुईमूग यांसारख्या पिकांमध्ये कोंब फुटण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके सडू लागली आहेत.
राज्यात पावसाचे आगमन जरी समाधानकारक वाटत असले, तरी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान, विजेची अनियमितता यामुळे नागरिक आणि शेतकरी दोघेही अडचणीत आले आहेत.
Mumbai,Maharashtra
May 22, 2025 11:25 AM IST
पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण! राज्यात कुठे आणि किती झालं नुकसान? वाचा सविस्तर