बोगस बियाण्यांचा फटका टाळण्यासाठी काळजी घ्या
पेरणीच्या ऐन वेळेस बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून बियाणे आणि खते महाग दराने विकले जातात. तसेच, अनधिकृत विक्रेत्यांकडून दिले जाणारे बोगस किंवा कालबाह्य बियाणे उत्पादनावर परिणाम करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पासूनच खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रांमधूनच खरेदी करा
अधिकृत परवाना व विक्री नोंद असलेल्या केंद्रांमधूनच खरेदी करण्यास प्राधान्य द्या. महाबीज, नाफेड, सिडको, कृषी विद्यापीठांची बियाणी ही विश्वासार्ह आणि दर्जेदार मानली जातात.
बियाण्याच्या पिशवीवरील माहिती तपासा
बियाण्याचा प्रकार, अंकुरणशक्ती, उत्पादन वर्ष, कालबाह्यता दिनांक, लॉट क्रमांक यांची तपासणी करावी.
खरेदीचं बिल व पावती अवश्य घ्या, यामुळे बियाणे बोगस निघाल्यास नुकसानभरपाईसाठी दावा करता येतो.
स्वस्त दराचे आमिष टाळा
स्थानिक बाजारात अनेकदा स्वस्त दरात बियाणे विकले जाते, पण ती बियाणे बिनपरवानी व बोगस असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनोळखी, अनधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करण्याऐवजी सरकारी संस्था किंवा सहकारी संस्थांच्या केंद्रांवरून खरेदी करणे योग्य.
खतांची खरेदी करताना लक्षात ठेवा
FCO नोंदणीकृत दुकानातूनच खरेदी करा
खत नियंत्रण आदेश (FCO) अंतर्गत नोंदणीकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करणे सुरक्षित. उत्पादन दिनांक, वजन, प्रमाणपत्र क्रमांक, उत्पादकाचे नाव यासारखी माहिती खतांच्या पिशवीवर तपासा.
बंद बॅगमध्येच खते घ्या
उघड्या स्वरूपात विकली जाणारी खते टाळा. खते खरेदी करताना पावती घेणे अनिवार्य, जेणेकरून भविष्यात काही त्रास झाल्यास कायदेशीर मदत मिळू शकते.
दरम्यान, बोगस बियाण्यांमुळे एकदा तरी नुकसान सहन करावे लागलेले अनेक शेतकरी दरवर्षीच अडचणीत सापडतात. म्हणून यंदा मान्सून वेळेआधी येणार असल्याने, वेळेत तयारी करून आणि योग्य ती खबरदारी घेऊनच खरेदी करावी. शेतकरी सजग राहिल्यासच दर्जेदार उत्पादन आणि आर्थिक फायदे मिळवता येतील.
Mumbai,Maharashtra