बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेतलेले अमृत जाधव मागील पाच वर्षांपासून पूर्णवेळ शेती करत आहेत. त्यांच्याकडे चार एकर शेतजमीन आहे. आपल्या शेतात ऊस आणि भाजीपाल्याची अभ्यासपूर्ण शेती अमृत करत आहेत. मागील वर्षी मे महिन्यात त्यांनी हळद पिकाचा प्रथमच प्रयोग केला. आवड, अभ्यास, कष्ट आणि उत्पादन खर्च करण्याची तयारी असल्याने ते हळद लागवडीकडे वळले.
लागवड पूर्व व्यवस्थापन
वडिलोपार्जित जमिनी पैकी सुपीक आणि निचरा होणाऱ्या एक एकर जमिनीची हळद लागवडीसाठी निवड केली. हळद लागवड करण्यापूर्वी एकरी 8 ट्रॉली शेणखत टाकून मशागत केली. बेड पद्धतीने हळद पिकाची यंत्राद्वारे लागवड करत ठिबक सिंचन करून पाण्याचे नियोजन केले.
संपूर्ण व्यवस्थापन
अमृत जाधव यांनी 60 टक्के सेंद्रिय खतांचा आणि 40 टक्के रासायनिक खतांचा वापर केला. अनुभवी शेतकऱ्यांच्या सल्ल्याने योग्य वेळी फवारण्या आणि आळवण्यांचे व्यवस्थापन केले. तसेच मजुरांकडून तीन भांगलनी देवून तण नियंत्रण केले. पाणी आणि खतांचे योग्य व्यवस्थापन करून जोमदार हळद पिकवली. पीक आठ महिन्यांचे झाल्यानंतर सिंचन व्यवस्था पूर्णपणे बंद केली. शेत खडखडीत वाळवून घेतले. 5 फेब्रुवारी पासून मजुरांच्या मदतीने हळद खणण्यास सुरुवात केली.
भरघोस उत्पादन
एक एकर शेतातून 15 ट्रॉली कच्ची हळद मिळाली. हळद काढणीनंतर आधुनिक यंत्राद्वारे शिजवून घेतली. बारा ते पंधरा दिवस खडक उन्हात वाळवून घेतली. मार्केटला पोहोचवण्यापूर्वी आधुनिक यंत्राद्वारे पॉलिश करून तब्बल 35 क्विंटल हळकुंड मिळाली. याशिवाय 28 क्विंटल दर्जेदार हळद बेणे मिळाले.
एक एकर हळदीचा उत्पादन खर्च
बेणे : 1 लाख 36 हजार
शेणखत(8 ट्रॉली): 45 हजार
खते (रासायनिक ): 50 हजार
सिंचन व्यवस्था, ट्रॅक्टर : 65 हजार
काढणीनंतरचा प्रक्रिया खर्च: 30 हजार
मजूर : 50
एकूण खर्च: 3 लाख 76 हजार
पिवळ्या सोन्याच्या नफ्याचं गणित
वाळलेली हळद 35 क्विंटल – 5 लाख
बेणे 28 क्विंटल – 80 हजार
(स्वतः शेतासाठी 16 क्विंटल शिल्लक ठेवले)
एकूण उत्पन्न: 5 लाख 80 हजार
एकूण खर्च: 3 लाख 76 हजार
एकरी नफा- 2 लाख 4 हजार
दरम्यान, लक्ष्मीच प्रतीक समजल्या जाणाऱ्या हळदीतून अमृत यांना सहा लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. यासाठी त्यांनी एकरी तब्बल साडेतीन लाखांचा उत्पादन खर्च केला. यासह शेतीचा अभ्यास आणि अनुभवी तज्ज्ञांच्या सल्लाने योग्य व्यवस्थापन केले. पुढेही मातीत घाम गाळून प्रयोगशील शेती करण्याची तयारी असल्याचे अमृत सांगतात. उच्चशिक्षित पत्नी रेणुका यांच्या सोबतीने पदवीधर शेतकरी अमृत जाधव करत असलेली समृद्ध शेती तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.
Sangli,Maharashtra
June 01, 2025 9:52 PM IST
नोकरीचा नाद सोडला अन् लावलं पिवळं सोनं, सांगलीचा युवा शेतकरी 4 एकरात मालामाल!