Last Updated:
Agriculture News : कायम दुष्काळी सावट असलेल्या मराठवाडा विभागात यंदाही जलसंकटाची टांगती तलवार दिसत आहे. विभागातील मोठे व मध्यम प्रकल्पांचा एकत्रित जलसाठा सरासरी 32 टक्क्यांपेक्षा कमी असून, लघुप्रकल्पांमध्ये केवळ 21 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
छ.संभाजीनगर : कायम दुष्काळी सावट असलेल्या मराठवाडा विभागात यंदाही जलसंकटाची टांगती तलवार दिसत आहे. विभागातील मोठे व मध्यम प्रकल्पांचा एकत्रित जलसाठा सरासरी 32 टक्क्यांपेक्षा कमी असून, लघुप्रकल्पांमध्ये केवळ 21 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
तरीही दिलासादायक बाब म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांत दुप्पट पाणीसाठा उपलब्ध आहे. दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात पावसाने फारशी कृपा न केल्याने 2023 मध्ये अनेक धरणांनी तळ गाठला होता. मात्र मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह अनेक प्रकल्प 50 टक्क्यांहून अधिक भरले गेले. त्यामुळे यंदाच्या कडक उन्हाळ्यातही तुलनेने समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे.
जायकवाडीचा मोठा आधार
मराठवाड्यातील सिंचनाचा कणा मानला जाणारा जायकवाडी प्रकल्प जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पाणी वितरीत करून जवळपास 1.75 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले आहे. सध्या डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरू असून, शेवटचे आवर्तन सुरू असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य प्रशासक यांच्याकडून देण्यात आली आहे.
धरणांची सध्याची स्थिती
प्रकल्प प्रकार धरणांची संख्या सध्याचा जलसाठा (%) गतवर्षीचा जलसाठा (%)
मोठे प्रकल्प 44 32% 11%
मध्यम प्रकल्प 81 31% 17%
लघुप्रकल्प 725 21% 12%
दरम्यान, मराठवाड्याला मिळालेला पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत चांगला असला तरी, उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचा वापर अत्यंत नियोजनपूर्वक करणं गरजेचं आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या खरीप हंगामात पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.
Mumbai,Maharashtra
May 13, 2025 11:59 AM IST
मराठवाड्यातील नागरिकांची चिंता वाढली! धरणांनी गाठला तळ, शिल्लक साठा किती?