देशातील दुसरी जैवसुरक्षा प्रयोगशाळा सुरू
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 86 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या जैवसुरक्षा स्तर-3 आणि स्तर-2 च्या देशातील दुसऱ्या प्रयोगशाळेचे उद्घाटन शनिवारी (ता. 24) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, सचिव डॉ. रामास्वामी एन., गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, आमदार उमा खापरे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे आदी उपस्थित होते.
उद्घाटनावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्य सरकार कृषी व पूरक व्यवसायांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे, आणि आता पशुपालनालाही तो दर्जा देण्याच्या दृष्टीने सरकार गंभीर आहे.”
प्लास्टिक उत्पादनावर बंदीची तयारी
उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी प्लास्टिकमुळे पर्यावरण, पशुधन आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख करत “पावसाळ्यातील पूरस्थिती आणि नाल्यांतील अडथळ्यांमागे प्लास्टिक हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालण्यात येईल,” अशी घोषणा केली.
पशुधनासाठी फायदेशीर लसी
नवीन जैवसुरक्षा प्रयोगशाळेतून तयार होणाऱ्या विविध लसी केवळ पशुधनासाठीच नव्हे, तर मानवासाठीही फायदेशीर ठरणार आहेत. कारण अनेक रोग प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतात. त्यामुळे ही लसीकरण सुविधा जनसामान्यांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.
प्रेरणादायी वातावरणासाठी 560 बदल्या
पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, “विभागात प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी विशिष्ट अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या जागा मिळायच्या, आता मात्र समुपदेशनाद्वारे 560 बदल्या पार पडल्या असून, केवळ 12 अधिकाऱ्यांना त्यांच्या पसंतीची जागा मिळू शकली नाही.” तसेच, नव्याने उभारलेल्या प्रयोगशाळेसाठी अतिरिक्त निधीची मागणीही त्यांनी केली.
पशुपालनात एआयचा वापर लवकरच
उपमुख्यमंत्री पवार यांनी “कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ऊस पीक यामध्ये यशस्वी वापर झाल्यानंतर आता हे तंत्रज्ञान पशुपालनातही वापरण्याचा विचार सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल,” असे स्पष्ट केले.
Mumbai,Maharashtra
पशूपालनासंदर्भात राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय! शेतकऱ्यांना होणार हा मोठा फायदा