Last Updated:
Weather Update : महाराष्ट्रात मे महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या झळांऐवजी आता पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात मे महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या झळांऐवजी आता पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसासह विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी यलो व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि विदर्भातील नागपूर, अमरावती या भागांतही मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अवकाळी पावसाचा असमान कहर
दरवर्षी मे महिना उष्णतेच्या तीव्र लाटेसाठी ओळखला जातो. मात्र यंदा हवामानात लक्षणीय बदल झाला आहे. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागांत जोरदार अवकाळी पाऊस झाला. आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार राज्यभरात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यामुळे राज्यभर दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. कोकणात सोमवार (दि.19) आणि मंगळवार (दि.20) रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये मंगळवार (दि.20) आणि बुधवार (दि.21)तर विदर्भमध्ये पुढील पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून वेळेपुर्वी अंदमानात दाखल
दरम्यान, अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले आहे. सध्या बेटांवर हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. यानंतर पुढील 3-4 दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान परिसरात अधिक सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विशेष म्हणजे, यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा एक आठवडा आधी अंदमानात दाखल झाला आहे. पुढील टप्प्यात तो दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि मध्य बंगालच्या उपसागरात विस्तारेल आणि नंतर केरळ व महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे.
Mumbai,Maharashtra
May 19, 2025 12:33 PM IST
शेतकऱ्यांची पुन्हा उडणार दाणादाण! इतक्या दिवसांसाठी अवकाळीचा मुक्काम वाढला