Last Updated:
Agriculture News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व कृषी विभागाची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्वसमावेशक लाभासाठी ‘फार्मर आयडी’ मोहिमेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामविकास व कृषी विभागाची आढावा बैठक पार पडली.या बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्वसमावेशक लाभासाठी ‘फार्मर आयडी’ मोहिमेला गती देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच या उपक्रमासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री चौहान यांनी दिली.
कृषी संशोधनावर भर, आधुनिक पद्धतींचा अवलंब आवश्यक
केंद्रीय कृषी संशोधन परिषद, नागपूर येथे झालेल्या या बैठकीत हवामानानुकूल पीक वाण, उच्च दर्जाची बियाणे, सेंद्रिय खतांचा प्रसार, स्मार्ट सिंचन, आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर देण्यात आला. मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात कृषी विभागाला स्पष्ट दिशानिर्देश दिले.
“कमी पर्जन्यमानाच्या भागांत अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करावेत, शाश्वत व प्रदेशानुरूप पीक पद्धती तयार कराव्यात,” असे सांगत त्यांनी राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव देशभर पोहोचवण्याचेही निर्देश दिले.
ग्रामविकास योजनांचाही सखोल आढावा
या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, जनमन, ग्रामसडक योजना, आणि मनरेगा यांसारख्या ग्रामविकास योजनांचे सादरीकरण करण्यात आले. मनरेगामधील प्रगतीबद्दल मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून ग्रामीण महिलांना मिळालेला आर्थिक आधार अधोरेखित केला आणि ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत एक कोटी महिलांना स्वावलंबी करण्याचे लक्ष्य जाहीर केले.
राज्य-केंद्र समन्वयाने विकासाची गती वाढवणार
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ग्रामविकास व कृषी क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, “केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पूर्ण पाठिंबा असेल आणि कृषी योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार्मर आयडी हे महत्त्वाचे माध्यम ठरेल.”
Mumbai,Maharashtra
May 19, 2025 11:23 AM IST
फार्मर आयडीबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्य सरकारला दिले आदेश! काय म्हणाले?