Last Updated:
महाराष्ट्रतील हवामानात हळद पिकाचे उत्पादन उत्तमरीत्या घेता येते. निर्यातक्षम आणि गुणवत्तापूर्ण हळद उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
सांगली: महाराष्ट्रतील हवामानात हळद पिकाचे उत्पादन उत्तमरीत्या घेता येते. निर्यातक्षम आणि गुणवत्तापूर्ण हळद उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद प्रक्रियेपर्यंत योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. यंदा सततच्या अवकाळी पावसाने अक्षय तृतीयेपासून टप्प्या-टप्प्याने हळद लागवडी चालू आहेत. हळद लागवडीपासून 110 दिवसांपर्यंत उत्पादन क्षमता वाढवणारी कोणती खतमात्रा द्यावी याविषयी अनुभवी आणि अभ्यासपूर्ण हळद उत्पादक शेतकरी शशिकांत काळगी यांनी महत्त्वाची टीप दिली आहे.
सांगलीच्या जत तालुक्यातील शशिकांत शिवाजीराव काळगी यांना 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पंजाबराव देशमुख कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. यांच्या शेतामध्ये अन्य पिकांसह गेल्या 40 वर्षांपासून हळदीचे उत्पादन घेतले जाते. आपल्या प्रयोगशीलतेतून एकरी 42 ते 45 क्विंटल हळद उत्पादित करण्याचा उच्चांक त्यांनी गाठला आहे. हळद पिकासंदर्भातील अनेक सेमिनार, चर्चासत्रे यांच्या माध्यमातून ते राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
हळद लागवडीनंतर उत्पादन वाढीसाठी पिकांना कोणती खते द्यावीत याविषयी त्यांनी लोकल 18सोबत संवाद साधला. कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी काळगी यांच्या अभ्यासानुसार, लागवडी पासून 25 ते 110 दिवसांमध्ये हळद पिकाला सर्वाधिक नत्र गरजेचे असते. हळद पिकास आवश्यक असणारे नत्र मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी 100 किलो युरिया द्यायला हवा. त्यांनी पुढे सांगितल्याप्रमाणे 25 ते 110 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने शंभर किलो युरिया एक एकर क्षेत्रास मिळाला तर हळद उत्पादन वाढीमध्ये फायदा होतो.
शशिकांत काळगी यांच्या अनुभवानुसार, खत नियोजन काटेकोरपणे केले तर एकरी 38 ते 45 क्विंटल हळदीचे उत्पादन हमखास मिळते. शेतकरी बांधवांनी शास्त्रीय माहितीचा उपयोग करून पिकाची उत्पादन क्षमता वाढवावी.
खत व्यवस्थापन
हळद पिकास हेक्टरी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी आणि नत्र दोन समान टप्प्यात विभागून द्यावे. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर 45 दिवसांनी आणि दुसरा हप्ता भरणीच्यावेळी म्हणजेच लागवडीनंतर 100 ते 105 दिवसांनी द्यावा.
भरणी करतेवेळी युरिया 215 किलो, फेरस सल्फेट (हिराकस) 12.40 किलो आणि झिंक सल्फेट 10 किलो आणि निंबोळी किंवा करंजी पेंड 2 टन प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. भरणीवेळी खतांच्या मात्रा दिल्यामुळे खते योग्यरीत्या मातीमध्ये मिसळली जातात.
पाणी व्यवस्थापन
पावसाचे पाणी जमिनीत साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतामध्ये पाणी साचून राहिले तर मुळांना ऑक्सिजन घेण्यास अडथळा येतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज मलूल होतात. अशावेळी साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.
ऑगस्ट, सप्टेंबर हा हमखास पावसाचा कालावधी असल्याने वाकुर्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे. जमिनीतील ओलाव्याचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन करावे.
रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबकचा कालावधी कमी जास्त करावा. सतत सिंचन केल्यामुळे जमिनीत अति ओलावा तयार होऊन हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.
Sangli,Maharashtra
June 09, 2025 1:09 PM IST
Turmeric Farming: हळदीच्या उत्पादन वाढीसाठी योग्य खतमात्रा आवश्यक, कसं कराल व्यवस्थापन? Video